औरंगाबाद : चंदनचोर अन् शिकाऱ्यांना वनविभागाचेच अभय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hivarkheda Gautala Sanctuary

औरंगाबाद : चंदनचोर अन् शिकाऱ्यांना वनविभागाचेच अभय!

औरंगाबाद : गौताळा अभयारण्यातील वनविभागाच्या हिवरखेडा येथील कार्यालयातून जप्त केलेले पाच लाखांचे चंदन आणि मौल्यवान दगडाची चोरी झाली. सर्व यंत्रणा असताना ही चोरी झाली. जे अधिकारी जप्त केलेल्या वस्तूची नीट देखरेख करू शकत नाही, ते जंगल आणि वनविभागाची सुरक्षा कशी करणार, अशा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. या चोरीसह सिल्लोड येथील खवल्या मांजर चोरीचे प्रकरणही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दाबून टाकले. यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकांवरच संशय व्यक्त केला जाता आहे.

वन्यजीवांची सुरक्षा आणि संवर्धनासाठी कार्यरत असलेला वनजीव विभाग ढेपाळल्याने असे प्रकार घडत आहे. गेल्या वेळी हिवरखेडा येथील कार्यालयासमोर असलेल्या वनविभागाची पेट्रोलिंग कार जाळण्यात आली. त्या आरोपीचाही अद्याप शोध लागला नाही. दुसरीकडे सिल्लोड भागात वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. यात खवल्या मांजराची चोरी करणाऱ्या रॅकेटला वन विभागाने पकडले. मात्र वनविभागाच्या ‘आशीर्वादा’ने शिकार करणाऱ्यांना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाला. वन्यजीव प्रकरणी जामीन मिळत नसतानाही हा जामीन मिळवून देण्यात आला.

अशाच प्रकारे सोयगाव येथेही खवल्या मांजराची तस्करी होताना कारवाई करणाऱ्यांना पकडण्यात आले. नंतर हे प्रकरण दाबून टाकण्यात आले. अजूनही या प्रकरणी कारवाई प्रलंबित आहे. त्यातच पुन्हा रविवारी मध्यरात्री जप्त केलेले चंदन, मौल्यवान दगड, सफेद मुसळी आणि डिंक यावर चोरांनी डल्ला मारला. चोरट्यांनी रेकी करून चोरी केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. चोरीत साडेअकरा किलो चंदन, ३०१ किलो मौल्यवान रंगीबेरंगी दगड, साडेपाच किलो सफेद मुसळी, सात किलो डिंक, ३४२ किलो जळतण चंदनाचा समावेश आहे. जप्त केलेले हे साहित्य वनविभागाच्या औरंगाबाद कार्यालयात का ठेवले नाही, वाहन जाळल्याची घटना घडल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने पावले का उलचले नाही असे अनेक प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहेत.

पाण्याआभावी प्राण्यांचा जातोय जीव

वन्यजीव विभागातर्फे वनपरिक्षेत्रात उन्हाळ्यात पाणवठ्याच्या माध्यमातून पाण्याची सुविधा दिली जाते. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील परिक्षेत्रात तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यात वनजीव विभागातर्फे पाणीच टाकण्यात येत नसल्याची बाब समोर आली आहे. पैठण, कन्नड, सिल्लोड-सोयगाव अन्य परिक्षेत्राताही हीच परिस्थिती आहे. विभागाला पाण्यासाठी पैसे नसल्याने तसेच इच्छाशक्ती नसल्याने पाणी टाकण्यात येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाणवठ्यात पाणी नसल्याने वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करताना दिसून येत आहे. यामुळे दर दोन दिवसाला मराठवाड्यात एका वन्यजीवाचा अपघातात, तसेच पाण्याअभावी मृत्यू होत आहे.

संरक्षणात कुठे खोट राहिली याच्या तपासणासाठी आम्ही विभागीय चौकशीचे काम हाती घेतले आहे. सहायक वनसंरक्षकाच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाणार आहे. याविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यात सीसीटीव्ही चेक करण्यात येणार आहे.

- डॉ. राजेंद्र नाळे, उपवन्यजीव संरक्षक

Web Title: Hivarkheda Gautala Sanctuary Chandan And Precious Stones Seized Forest Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top