तालुक्यातील चिंचपूर ( बु ) येथे आयसीआयसीआय शाखेचे उद्घाटन

तालुक्यातील चिंचपूर ( बु ) येथे आयसीआयसीआय शाखेचे उद्घाटन
Published on: 
PDA26A05580 परंडा ः चिंचपूर (बु.) येथे आयसीआयसीआय बँकेच्या शाखेच्या उद्‍घाटनप्रसंगी मीना पाटील आणि माहेश्वरी पाटील. चिंचपूर येथील बँकेच्या शाखेचे उद्‍घाटन परंडा : तालुक्यातील चिंचपूर (बु.) येथे जिल्हा परिषदेचे माजी सभापती रणजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यातून आयसीआयसीआय बँकेची शाखा सुरू झाली आहे. मंगळवारी (ता. १३) बँक व नवीन इमारतीचे उद्‍घाटन मीना रणजितसिंह पाटील आणि माहेश्वरी युवराजसिंह पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी रणजितसिंह पाटील, आंबी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन चौधर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, माजी उपसरपंच युवराजसिंह पाटील, अमोल नलवडे, गणेश भिल्लारे, विष्णू शेवाळे, सरपंच महेश देवकर, शरद भिल्लारे आदी उपस्थित होते. महामार्ग आणि विविध प्रकल्पांमुळे येथे आर्थिक उलाढाल मोठी आहे. बँकेमुळे नागरिकांची सोय होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास रणजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. ........... फोटो ओळ : UMR26A18834 उमरगा येथील शरणाप्पा मलंग विद्यालयात समुपदेशन शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. सुचेता पोफळे. ‘किशोरवयात योग्य आहार महत्त्वाचा’ उमरगा : उमरगा रोटरी क्लबच्या वतीने शरणाप्पा मलंग विद्यालयात १४ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन शिबिर घेण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. सुचेता पोफळे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, योग्य आहार, शारीरिक व मानसिक बदल आणि व्यसनांपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले. किशोरवयात शरीराची झपाट्याने वाढ होत असल्याने आहारात प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करावा. या वयात निर्माण होणाऱ्या आकर्षणांबाबत योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे, असे डॉ. पोफळे यांनी सांगितले. मुख्याध्यापक अजित गोबारे अध्यक्षस्थानी होते. रोटरी क्लबचे सचिव शिवशंकर व्हंडरे, कविता अस्वले, अनुजा मदनसूरे उपस्थित होते. परमेश्वर सुतार यांनी सूत्रसंचालन केले. शिबिराच्या आयोजनासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला. ....................... BMH26A09982 भूम : तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या संघाचा सत्कार करण्यात आला. शंकरराव पाटील महाविद्यालयाची बाजी भूम : येथील क्रीडा संकुलात १३ ऑक्टोबरला झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम सामन्यात अंतरगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाला पराभूत करून शंकरराव पाटील महाविद्यालयाने विजय मिळविला. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्या विकास मंडळ, पाथरूडचे सहसचिव प्रा. डॉ. संतोष शिंदे आणि क्रीडा प्रशिक्षक महेश सूर्यवंशी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या विजयामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत भर पडली असून, खेळाडूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. ................. सणासुदीत सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी नळदुर्ग : नवरात्रोत्सव आणि आगामी दिवाळीच्या काळात इमर्जन्सी भारनियमनाच्या नावाखाली शहरातील वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात महावितरणचे अभियंता दाऊद तगारे आणि सचिन चाफेकर यांना निवेदन देण्यात आले. सण-उत्सवांच्या काळात शहरात धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतात. अशा वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे भारनियमन तातडीने बंद करावे; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदनावर नगरसेवक सुधीर पोतदार, मारुती खारवे, आकाश कुलकर्णी, विलास येडगे, गणेश मोरडे, विजय ठाकूर आणि रवी सुरवसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ................. नवरात्रोत्सवात अनियमित वीजपुरवठा लोहारा : शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू असताना महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे धार्मिक कार्यक्रमांत अडथळे येत आहेत. विशेषतः सायंकाळी सहा ते आठ या वेळेत दोन तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. मंदिर परिसरात महिला, लहान मुले आणि भाविकांची गर्दी असताना अंधारामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी नगरसेविका तथा भाजपच्या तालुकाध्यक्ष आरती सतीश गिरी यांनी महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. उजनी केंद्रातील फ्रिक्वेन्सी निर्धारित मर्यादेपेक्षा कमी झाल्यास तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उजनी केंद्राशी समन्वय साधून प्रयत्न केले जातील, असे महावितरणचे उपअभियंता विश्वास गुंडल यांनी सांगितले. ................ KMW26A01228 समीक्षा तांदळे स्पेलिंग बी स्पर्धेत समीक्षा तांदळेचे यश खामसवाडी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) वतीने आयोजित तालुकास्तरीय इंग्रजी शब्दलेखन स्पर्धेत जिल्हा परिषद प्रशाला, खामसवाडी येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी समीक्षा संदीप तांदळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. १४ ऑक्टोबरला झालेल्या ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत इंग्रजी शब्दांचे अचूक लेखन, शब्दज्ञान आणि भाषिक कौशल्याच्या जोरावर समीक्षाने हे यश मिळविले. तिची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पुढील वाटचाल होणार आहे. या यशाबद्दल मुख्याध्यापक आर. एस. पवार, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. नियमित अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर समीक्षाने मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ................ BMH26A09984 युवराज घुले युवराजची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड भूम : तालुक्यातील घुलेवाडी येथील दिव्यांग शेतकरी हनुमंत तात्याराव घुले यांचा मुलगा युवराज घुले याने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बीड येथील शिवाजी विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिल्हास्तरीय आणि विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या संघात युवराजचा समावेश आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा २६ सप्टेंबरला, तर विभागीय स्पर्धा ७ ऑक्टोबरला झाली. दोन्ही स्पर्धांतील विजयामुळे संघाची राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धा ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रशिक्षक नितीन येळवे, शोयब खाटीक आणि अशोक चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज सराव करतो. या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. ............. BMH26A09986 भूम ः : विभागीय क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल शरयू महामुनीचा सत्कार करताना मुख्याध्यापक किरण जाधव. शरयू महामुनीची विभागीय संघात निवड भूम : श्री गुरुदेव दत्त हायस्कूलची विद्यार्थिनी शरयू अनिल महामुनी हिची विभागीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक किरण जाधव यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुदेव प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक भोरे, पर्यवेक्षक बांगर, वर्गशिक्षक राऊत, क्रीडाशिक्षक शिंदे तसेच प्रशालेतील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. या निवडीबद्दल शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, पुढील स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या. ........................... BMH26A09988 भूम ः तहसील कार्यालयासमोर जमिनीच्या मोबदल्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले प्रा. दत्ता साठे. भूम येथे दत्ता साठे यांचे उपोषण भूम : तहसील कार्यालयासाठी १९६३ पासून वापरण्यात येत असलेल्या गट क्रमांक २२१ मधील ५१ आर जमिनीचा मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रा. दत्ता बबन साठे यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दिवाणी न्यायालयाने २८ जानेवारी २०२६ ला संबंधित प्रकरणात दोन महिन्यांत भूसंपादन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याचा दावा साठे यांनी केला आहे. आठ महिने उलटूनही अंमलबजावणी झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अपिलात स्थगिती आदेश नसल्याचाही त्यांनी दावा केला. १३ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पुन्हा उपोषण सुरू ठेवले. न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करून बाजारभावानुसार मोबदला द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. ......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com