UMR26A18852
तलमोड : श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात तानाजी तिगलपल्ले यांच्या वतीने विद्यार्थ्यांना साहित्य भेट देण्यात आले.
- -
तानाजी तिगलपल्ले यांच्याकडून
तलमोड प्रशालेस साहित्य भेट
उमरगा : भारत शिक्षण संस्था संचलित तलमोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात दिवंगत सुधाकर रामजी तिगलपल्ले यांच्या स्मरणार्थ तानाजी सुधाकर तिगलपल्ले यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्टील डायस, १० पाण्याचे जार भेट देण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात आणि शाळेचा विकास व्हावा, या उदात्त हेतूने त्यांनी हे योगदान दिले आहे. या सामाजिक बांधिलकीबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक विराज मोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने तानाजी तिगलपल्ले यांचे आभार मानण्यात आले.
..................................
‘समुद्राळ-सालेगाव रस्त्याची दुरुस्ती करा’
उमरगा : समुद्राळ-कलदेव निंबाळा-सालेगाव हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील डांबरी रस्ता खराब झाला असून, त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी कलदेव निंबाळा ग्रामपंचायत गटनेत्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सुनीता देविदास पावशेरे यांनी उपविभागीय अभियंता एन. बी. सगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या रस्त्यावरून लोहारा, मुरूम, सास्तूर आणि नारंगवाडीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र, खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, अपघातांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी ग्रामपंचायतीच्या ठरावासह केली. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच पावसाळ्यात समुद्राळकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी गावातील शाळा व वस्तीत शिरत असल्याने मुख्य रस्त्यालगत सिमेंट नाली बांधण्याची मागणीही त्यांनी केली.
.....................
UMR26A18847
उमरगा : रोटरी क्लब वतीने भारत विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘आयडियल स्टडी ॲप’चे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब वतीने ‘आयडियल स्टडी ॲप’
उमरगा : रोटरी क्लबच्या वतीने शहरातील भारत विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘आयडियल स्टडी ॲप’ उपलब्ध करून देण्याचा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना महागड्या खासगी शिकवण्यांशिवाय गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे आणि आगामी दहावी बोर्ड परीक्षेची प्रभावीपणे तयारी करता यावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘आयडियल स्टडी ॲप’मध्ये इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे धडे दृकश्राव्य स्वरूपात, सोप्या नोट्स आणि पाठ्यपुस्तकांसह उपलब्ध आहेत. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या आपल्या सोयीनुसार अभ्यास करता येणार असून, अवघड संकल्पना समजून घेण्यास आणि परीक्षेची तयारी अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी रोटरी क्लब हा उपक्रम राबवीत आहे, असे माजी अध्यक्ष प्राचार्य संजय अस्वले यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक संजय देशमुख, रोटरी क्लबचे सचिव शिवशंकर व्हंडरे, सदस्य धनंजय वेदपाठक, उपमुख्याध्यापक विक्रांत मोरे तसेच प्रशालेतील शिक्षक उपस्थित होते.