
केंद्र सरकारने व्हेंटिलेटरच्या नावाने चक्क 'डब्बे' पाठवलेत का? इम्तियाज जलीलांचा सवाल
औरंगाबाद : पीएम केअर्स फंडातून (PM Cares Fund) मिळालेले दीडशे व्हेंटिलेटर (Ventilator) खराब आणि बिनकामाचे निघाले. घाटीतील (Ghati Hospital) तज्ज्ञ डॉक्टारांच्या टीमने देखील यावर शिक्कामोर्तब केले आहे. केंद्राने व्हेंटिलेटरच्या नावावर डब्बे पाठवलेत का ? असा सवाल करत संबंधित कंपनी, एजन्सीवर राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.१७) झालेल्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत पीएम केअर्समधून मिळालेल्या व्हेंटिलेटरचा मुद्दा चांगलाच गाजला. (Imtiaz Jaleel Said, Central Government Only Send Metal Boxes Instead Of Ventilators)
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, की व्हेंटिलेटरवरून राजकारण केले जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. पण कोरोना संकटाच्या काळात राजकारण कुणालाही करायचे नाही. पण पीएम केअर्स निधीमधून देण्यात आलेले व्हेंटिलेटर फक्त औरंगाबाद, मराठवाड्यातच नाही तर देशातील अनेक राज्यात नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे. घाटीमध्ये वर्षानुवर्षे व्हेंटिलेटर आहेत. येथील तज्ज्ञ डॉक्टर त्यावर रुग्णांना उपचार देतात. मग आताच त्यांना ते कसे चालवावे याचे ज्ञान नाही, असे म्हणणे कितपत योग्य आहे.
ज्या कंपनीने व्हेंटिलेटर बनवले, त्यांचे तज्ज्ञ येऊन देखील ते सुरू होऊ शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मग हे व्हेंटिलेटर केंद्र सरकारने परग्रहावरून बनवून आणले आहेत का? असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला. दरम्यान, रासायनिक खतांच्या किंमती नियंत्रित ठेवाव्या, सीएसआर फंडातून शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध कुरन द्यावे अशा मागणीचे पत्र खासदार इम्तियाज यांनी पालकमंत्री देसाई यांना दिले.