international women day 2023 : 'ती'च्याशिवाय सारेच सुन्य! International Women Day 2023 sambhaji nagar respected since ancient times | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women day

international women day 2023 : 'ती'च्याशिवाय सारेच सुन्य!

जन्म म्हणजे विश्वातील अलौकिक आणि सर्वश्रेष्ठ भेट! ही अनमोल भेट आपल्याला विनामुल्य मिळाली ती आईकडून! जगाचं भरण-पोषण करणारी माती आणि नवजीवन देणारी माता यांचं मोल कोणताही जवाहीर करू शकत नाही!

या दोघींचे मूल्य आणि मोजदाद करणारे मापदंड आणि मोजणीयंत्र सूर्य चंद्र असेपर्यंत सापडणे दुरापास्तच! म्हणूनच 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' यात माता आणि माती या दोनच स्वर्गापेक्षा महान आहेत असे गौरविले आहे. जी विविध रूपांनी माणसाचं जगणं आणि वागणं समृद्ध करते ती स्त्री! तिची विविध रूपं आणि योगदान आज विविध अंगांनी मुल्यांकित होऊन 'ती'ला जीवन तत्वांनी वलयांकित करणे अपेक्षित आहे.

अगदी प्राचीन कालापासून स्त्रीचा सन्मान होत आला आहे.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।

यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।

जिथे स्त्री सन्मानित होते तिथेच खऱ्या अर्थाने ईश्वरपूजा होते, आणि जर ती अपमानित होत असेल तर सर्वकाही निरर्थक! स्त्री कुटुंबाचा कणा असते. नेहमी तीचा निर्णय आणि सल्ला कुटुंबकल्याणकारी असतो. तिची दूरदृष्टी विश्वकल्याणासाठी सार्वकालिक उपयुक्त असते, त्यामुळेच ती सर्वकाळ वंदनीय आहे. ती कुटुंबातील अशी महत्वपूर्ण व्यक्ती आहे; जी अनंत भूमिका मोठ्या जबादारीने आणि शिताफीने निभावत असते.

जगातील सर्वश्रेष्ठ स्त्री म्हणजे माय-आई! आपण सारे जिच्या उदरात नऊ महिने राहिलो, अगदी गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून तिने आपले संगोपन-शुश्रुषा केली. म्हणूनच इथे आईचे महत्व प्रथम विषद केले आहे.

सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः।

औदार्यं वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान ।।

हे तिचे अनन्यसाधारण योगदान माणसाच्या जीवनात असते, म्हणूनच आत्तापर्यंत हजारो काव्य, महाकाव्य, कथा, कादंबरी आणि निबंध लिहून सुद्धा आईची महत्ती संपलेली नाही. त्यामुळेच तर संत तुकाराम महाराज सुद्धा

लेकुराचे हित । वाहे माऊलीचे चित्त ।।

ऐशी कळवळ्याची लाटी । करी लाभाविण प्रीती।।

हा अभंग लिहून आईची महती विषद करतात. आईं वात्सल्य छाया, जी आपल्या लेकराला स्तन्य देऊन नवसंजीवनी देते. झाडं, नद्या आणि डोंगराप्रमाणे निश्वार्थ भावनेने बाळाचे संगोपन करते. म्हणूनच 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' किंवा 'आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही' अशा अजरामर ओळी लिहून अनेक कवींनी मातृतीर्थास वंदन केले आहे.

छत्रपती शिवबाकडून रयतेचं राज्य घडवणाऱ्या आईसाहेब जिजाऊ आम्हा नित्य वंदनीयच आहेत. अशा या आई नावाच्या संस्कार विद्यापीठाने तुम्हा-आम्हा सर्वांनाच अजन्म अमृतस्पर्श करून समर्पित केले आहे. तिच्याप्रती शब्दाने कृतज्ञ होता नाही आलं तरी सदैव तिच्या चरणी नतमस्तक व्हावं, एव्हढंच काय ते करता येणं शक्य आहे !

दुसरी कळीची भूमिका गृहस्थाश्रमात ती पत्नी म्हणून आपले अनन्यसाधारण योगदान देत असते. या संदर्भाने एक अतिशय महत्वपूर्ण श्लोक आला आहे.

न गृहम इति उच्चयते-गृहिणी गृहम उच्चयते । गृहम ही गृहणी हिंनम-अरण्य-सदृशंम ।।

मोठ्या सन्मानाने आणि अभिमानाने 'प्रत्येक यशश्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते' असे सर्वत्र म्हटले जाते म्हणजे तिची पत्नी ही भूमिका किती महत्वाची आहे(?) ते लक्षात येते.

गृहिणी वरूनच घराला घरपण येतं. ती नसेल तर घराचं अरण्य व्हायला वेळ लागत नाही. घरात दहा कर्तबगार पुरुष असुन जर त्या घरांत गृहिणी नसेल तर ते घर उकिरडा होऊन जाईल! त्यामुळेच पत्नीची महती अनेक सुभाषितं, गीतं गात असतात.

'पत्नी ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे' असं म्हटलं जातं; याचं कारण म्हणजे ती घरातील प्रत्येकाचं सदैव आई होऊनच संगोपन करते. 'जी अर्धांगिनी पतीला पतनापासून रोखते आणि त्याचे उत्थान करते' ती म्हणजे पत्नी! शिवाय तिचे श्रेष्ठत्व इथे सापडते.

अर्ध भार्या मनुषस्य l भार्या श्रेष्ठतम सखा l l

भार्या मुलं त्रिवर्गस्य l भार्या मुलं तरिष्यती l l

पत्नी पुरुषाचे अर्धे शरीर असून ती पुरुषाचा जिवलग मित्र आहे. धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ साधण्याचे मूळ तिच आहे. संसार लीलया पेल्ण्य्साठी खऱ्या अर्थाने भार्याच उपयोगी पडते! संसाराचा भार सांभाळते म्हणून भार्या! अनेक महापुरुषांच्या कार्यात पत्नीने सिंहाचा वाटा उचलेला आहे. शहाजी राजांची जहागिरी जिजाऊनी सांभाळली, 

ज्योतीरावांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी खंबीर साथ दिली, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना रमाबाईंनी मोलाची साथ दिली. गृहस्थाश्रमी पत्नीचे महत्व अनन्यसाधारण असून तीच संसाराचा कणा असते. अनेकवेळा खडतर काळात अनेक स्त्रियांनी (पत्नी) आपला जीव धोक्यात घालून आपल्या पतीला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले आहे.

आणखी एक नातं म्हणजे लेक-मुलगी-कन्या! कोणत्याही बापाला लेक म्हणजे आपली दुसरी आईच वाटते! लेकच आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आधार बनते. म्हणूनच

कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक l तयाचा हरिख वाटे देवा l l

यातून कुळातील कन्या ही कुटुंबाचा महत्वपूर्ण सदस्य आहे हेच तुकोबांना अधोरेखित करावयाचे आहे. ती खऱ्या अर्थाने त्या घराचा वसा आणि वारसा पुढे चालवत असते.

कित्येक मुलांनी आई-वडील घरातून काढून दिल्यानंतर मुलींनी त्यांना सभाळले आहे. लेकीची माया ही अगणित असते. अनेक एकुलत्या एक लेकींनी आपल्या आई-बापाचे नाव अजरामर केले आहे. अहिल्याबाई होळकर, जिजाऊ आईसाहेब, इंदिरा गांधी, कल्पना चावला, किरण बेदी, सिंधुताई सपकाळ अशा अनेक लेकींनी महत्कार्य करून इतिहास घडवला आहे.

म्हणून लेकच माय-बापाचा खरा वारस असते! त्याशिवाय बहिण म्हणून ती प्रत्येक भावाच्या अडीअडचणीत पाठीमागे खंबीरपणे उभी असते. बहिण-भावाचे नाते अलौकिक आहे! भावाला मोठी बहिण आईसारखी तर लहान बहिण ही मुलीसारखी असते! आपल्या भावाच्या भल्यासाठी रात्रंदिवस मनोमन प्रार्थना करते ती म्हणजे फक्त आणि फक्त बहीणच! परिणामी जीवनातून 'ती'ला वगळणे अश्यक्य,

म्हणून 'ती'च्याशिवाय सारेच शून्य! याचा अर्थ पुरुष सुद्धा आपली भूमिका व्यवस्थितपणे निभावतात. स्त्री- पुरुष हे गाडीची दोन चाकं असून यातील एकसुद्धा वेगळं करता येणार नाही. असं असलं तरी, स्त्री ही सगळीकडे काकणभर उजवीच भरते!  

असं असलं तरी, आज स्त्रीचा छळ थांबलेला नाही. प्रत्येकाला आई, पत्नी, मुलगी, बहिण हवी असते तरी स्त्रीभ्रूण हत्या थांबल्या नाहीत? हुंड्यापायी तिला जाळलं-छळलं जातंय! शेतात समान काम समान वेतन दिलं जात नाही. कायदा असूनसुद्धा भावनिक करून बापाच्या संपत्तीतून हक्कसोड प्रमाणपत्रावर सह्या घेऊन तिला बेदखल केलं जातंय!

तिच्या भावनांची पायमल्ली थांबली नाही! तेंव्हा शाळेत टाकतांना वडीलाबरोबर आईचं सुद्धा नाव लावायला हवं! 'ती'च्याशिवाय सारेच शून्य असले तरी आजघडीला प्रत्येकाने तिच्या भावना, अधिकार आणि मुल्यांची कदर करणे गरजेचे आहे. तिच्याकडे केवळ उपभोग्य वस्तू म्हणून न पाहता माणूस म्हणून पहावे! तेंव्हा चला पुरुषांनो, तिला नित्य सन्मान देण्याची शपथ घेऊन या वर्षीचा महिला दिन साजरा करूयात! मातृ देवो भव:!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये