
Sambhaji nagar : उपायुक्त थेटे यांची इडीकडून चौकशी
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालयाकडून (इडी) केला जात आहे. सोमवारी (ता. २०) महापालिकेच्या उपायुक्त तथा घरकुल योजनेच्या विभागप्रमुख अपर्णा थेटे मुंबईतील इडी कार्यालयात हजर झाल्या. त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेने प्रकल्पासाठी सुमारे ३९ हजार घरांसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात अनियमितता झाल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या चौकशीतून समोर आले. दरम्यान या प्रकरणाचा तपास इडीकडे गेला आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १७) शहरात येऊन विविध ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. महापालिका मुख्यालयात येत कागदपत्रे हस्तगत केली. तसेच उपायुक्त अपर्णा थेटे यांना चौकशीसाठी मुंबईला बोलाविण्यात आले होते. त्यानुसार सकाळी १० वाजता अपर्णा थेटे या इडी कार्यालयात हजर झाल्या. तिथे त्यांची चौकशी झाल्याचे समजते.
यासंदर्भात प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, इडीचा तपास स्वतंत्रपणे सुरू आहे. श्रीमती थेटे या त्या विभागप्रमुख होत्या. तसेच महापालिकेतर्फे कंत्राटदाराविरोधात देण्यात आलेल्या तक्रारदार त्यात आहेत. त्यामुळे इडीने त्यांना बोलविले असावे. दिवसभरात त्यांच्याकडून मला कुठलीही माहिती आलेली नाही, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.