
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात बोर्डाने आपल्यास्तरावर दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांची सर्व तयारी पूर्ण केली आहे. पण, यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळा कितपत तयार आहेत? याचाही विचार बोर्डाने करायला हवा. विद्यार्थ्यांच्या परीक्षा विषयक तयारीचा विचार करणे का गरजेचे आहे?
- डॉ. रूपेश चिंतामणराव मोरे
यं दा मार्च २०२२ ला जे विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत ते विद्यार्थी एप्रिल २०२० ला आठवीत होते. देशात २० मार्च २०२० पासून लॉकडाउन लावले. त्यावर्षी दहावीचा भूगोलचा पेपर व पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यावेळी प्रथम सत्र, चाचणी परीक्षेच्या गुणांवर निकाल तयार केला. नंतर हीच मुले एप्रिल २०२१ ला नववीत गेली. २०२० ते २०२१ या संपूर्ण शैक्षणिक वर्षात दोन महिन्यांचा अपवाद वगळता (त्यातही पन्नास टक्के विद्यार्थी उपस्थितीची अट होतीच) शाळा बंदच होत्या. ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन चाचण्या, विद्यार्थी ऑफलाइन घरून पेपर लिहून आणून द्यायचे या सर्व कारणांमुळे मुलांचा खरंच, लेखी परीक्षेचा सराव झाला का? हाही एक प्रश्नच आहे. थोडक्यात आज जी मुले दहावीच्या परीक्षा देणार आहेत, त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे वार्षिक मूल्यमापन हे ती मुले जेव्हा वर्ष २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवीत असताना झाले आहे.
यंदा महानगरांमध्ये ४ ऑक्टोबर २०२१ पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. दिवाळी सुट्या, अध्यापनासाठी अल्प वेळ, पन्नास टक्के उपस्थितीची अट, घड्याळी तीन तास शाळा आणि आता तिसऱ्या लाटेच्या या पार्श्वभूमीवर झालेली शाळा बंदी या सर्व गोष्टींचा विचार करता, प्रथम सत्र परीक्षा शाळांमधून झाल्या असल्या तरी त्यात किती वस्तुनिष्ठता असेल? हा प्रश्न आहे. ग्रामीण महाराष्ट्रात कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १५ जुलै २०२१ पासून सुरू झाले. पण, वरील सर्व अटी होत्याच. ग्रामीण भागात १५ जुलैपासून तर शहरात ४ ऑक्टोबरपासून दहावीचे वर्ग सुरू झाले. यात दहावीच्या अभ्यासक्रम शिकविण्याबाबत महाराष्ट्रातील शाळांमध्ये एक वाक्यता नाही. अशावेळी सर्व मुलांसाठी एक सारखी परीक्षा घेणार तरी कशी? पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. यात सातवी व आठवीसाठी ५० गुणांची प्रत्येक विषयाची लेखी परीक्षा (संकलित चाचणी) असते. इयत्ता नववी व दहावीसाठी राज्य मंडळाने जाहीर केलेल्या मूल्यमापन पद्धतीने मूल्यमापन केले जाते.
नववी व दहावीसाठी विषयावर ८० गुणांचा लेखी पेपर असतो. भाषा विषयासाठी कृतीपत्रिका असते. सध्या दहावीत शिकणाऱ्या मुलांसाठी ही मूल्यमापन पद्धती व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप नवे आहे. गेल्या वर्षी दोन महिने अपवाद वगळता नववीचे वर्ग भरले नाहीत. यावर्षी ऑक्टोबर आणि डिसेंबर हे दोन महिने वगळता या मुलांचे दहावीचे वर्ग भरले नाहीत. अगदी आकडेवारीत द्यायचे तर औरंगाबादमध्ये ऑक्टोबरमध्ये २२, नोव्हेंबरमध्ये ७ दिवस, डिसेंबरमध्ये २५ आणि जानेवारीमध्ये ३ दिवस असे एकूण प्रत्यक्ष ५७ दिवस वर्ग भरले. त्यात पन्नास टक्के उपस्थिती अट विचारात घेतली तर दहावीतील एक विद्यार्थी अवघ्या २८ दिवस शाळेत आला. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाची साधने नसणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचा बोर्डाने इयत्ता दहावीसाठी निर्धारित केलेला अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे का? असल्यास तो कोणत्या विषयाचा किती अभ्यासक्रम प्रत्यक्ष वर्गात शिकवून झाला आहे? या प्रश्नांची उत्तरे निश्चित नाही. असे असताना यंदा बोर्ड जर विद्यार्थ्यांची नियोजनानुसार व प्रचलित मूल्यमापन पद्धतीने परीक्षा घेणार असेल तर हे विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक होईल. ऑनलाइन शिक्षणाची साधने नसणाऱ्या ग्रामीण व दुर्गम भागातील तसेच शहरी भागातील श्रमजीवी पालकांच्या मुलांचे काय? त्यामुळे बोर्डाने आपल्या प्रचलित परीक्षांचा आग्रह जरा बाजूला ठेवत, परीक्षेला निश्चित केलेला अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका स्वरुप, प्रश्न प्रकार, गुणदान पद्धती यात लवचिकता आणायला आणून त्याची घोषणा किमान महिनाभर आधी करायला हवी. शिवाय परीक्षेत काही बदल हवेत.
हे असावेत बदल
बोर्डाने प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी किमान अर्धा तास वाढून दिला आहे. ही निश्चित स्वागतार्ह बाब आहे. त्याबरोबरच लेखी परीक्षा ८० गुणांऐवजी ४० गुणांची असावी. त्या-त्या विषयाचा अजून काही अभ्यासक्रम परीक्षेतून वगळता येतो का? याचा विचार करून मुलांना वर्गात प्रत्यक्ष जे घटक शिकविले त्यावर प्रश्नपत्रिका तयार कराव्यात. प्रश्नांची काठिण्य पातळी, स्वरूप ही अधिक विद्यार्थी अभिमुख असावेत. बोर्ड प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रम गुणदान या बाबतीत जो काही बदल करेल, त्यानुसार नमुना प्रश्नपत्रिका आधी विद्यार्थ्यांच्या सरावासाठी काही बोर्डाने प्रकाशित करायला हव्यात. उत्तीर्ण होण्याच्या किमान गुणांच्या निकषातही बोर्डाने लवचिकता आणावी. बोर्डाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्राऐवजी शाळा हेच परीक्षा केंद्र ठेवले तर विद्यार्थ्यांवर दडपण येणार नाही. या सर्व तयारीसाठी परीक्षांचे वेळापत्रक थोडे पुढे ढकलावे लागले. विद्यार्थीहिताच्या दृष्टीने निश्चित यावर विचार करायला हवा. ऑनलाइन पद्धतीने काही मुलांनी अभ्यास व परीक्षेची तयारी पूर्ण केलीही असेल, पण बोर्डाने ऑनलाइन शिक्षणाची साधने नसणाऱ्या ग्रामीण, दुर्गामभागातील शेवटच्या विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून परीक्षेच्या संदर्भात विचार करायला हवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.