पाणी उपसा रोखण्यासाठी कठोर पाऊले उचला

पाणी उपसा रोखण्यासाठी कठोर पाऊले उचला
Published on
राखीव जलसाठ्यावर डल्ला नको! पाणीउपसा रोखण्यासाठी विद्युत मोटारी जप्त करण्याचे आदेश ----- जळकोट, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुक्यातील साठवण व पाझर तलावांमधील उपलब्ध पाणीसाठा टंचाईच्या कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या तलावांमधून शेतीसाठी होणारा पाणीउपसा तातडीने रोखावा. कारवाईत दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजेश लांडगे यांनी पाटबंधारे, महसूल, पंचायत समिती, महावितरण, पोलिस तसेच ग्रामसेवकांची तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक घेतली. यावेळी शिंदे यांनी शेतीसाठी होणारा पाणीउपसा बंद करण्यासाठी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करून विद्युत मोटारी व केबल जप्त करण्याच्या सूचना दिल्या. विविध तलावांमधून विद्युत मोटारी व इंजिन बसवून मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी पाणीउपसा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. मोटारी काढून घेण्याच्या सूचना देऊनही काही ठिकाणी रात्री-अपरात्री पंप सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तालुक्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. उपलब्ध पाण्याचा मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी उपसा झाल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आणि रब्बी हंगामातील सिंचनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा काटेकोरपणे जतन करणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. बैठकीस तहसीलदार राजेश लांडगे, मुख्याधिकारी रोहित आरबोले, गटविकास अधिकारी ऐश्वर्या चितारी, अभियंता मयूर पाचपुते, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम माचेवाड, नायब तहसीलदार कराड, पाणीपुरवठा अभियंता शेलार, गटशिक्षणाधिकारी शाहू, तलाठी अतिक शेख, मंडल अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com