esakal | शेवटी माणुसकीच! पालिकेच्या योद्ध्यांकडून होतोय वर्षभरापासून रुग्णांवर अंत्यसंस्कार

बोलून बातमी शोधा

शेवटी माणुसकीच! पालिकेच्या योद्ध्यांकडून होतोय वर्षभरापासून रुग्णांवर अंत्यसंस्कार
शेवटी माणुसकीच! पालिकेच्या योद्ध्यांकडून होतोय वर्षभरापासून रुग्णांवर अंत्यसंस्कार
sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : आपल्या ओळखीचा किंवा नात्यातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर प्रत्येक जण स्वतःच्या हातातील काम सोडून अंत्यविधीसाठी धावपळत जातो. परंतु, कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून प्रत्येक जण स्वतःला सुरक्षित करण्यासाठी कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणार नाही. याची काळजी घेत आहे. अशात कोणतही नाते नसताना किंवा ओळख नसताना जीव धोक्यात टाकून नगरपालिकेचे योद्धा मागील वर्षभरापासून कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत. जिल्ह्यात कोरोना रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. अशात उपचारादरम्यान अनेकांचा मृत्यू होत आहे. रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाच्या भीतीने नातेवाईक ही मृतदेहाच्या जवळ येत नाहीत. तर दुसरीकडे कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये, म्हणून प्रशासनही कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करत नाहीत.

हेही वाचा: खासदार जलील रुग्णांच्या मदतीला, घाटीला चार हजार सलाईनच्या बॉटल्स दिल्या भेट

त्यामुळे जालना नगरपालिकेकडून मागील वर्षभरापासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. मागील वर्षभरापासून स्वतःच्या जीवाची पर्वा न करताना जालना नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अरुण वानखेडे, शोयब खान, संजय वाघमारे, राजू मोरे, राहुल मापारी यांच्यासह दीपक कारके, आत्माराम भालेराव, प्रभुदास दोशडे, दादाराव कुकरे, राम लोखंडे, कैलास लोखंडे, एकनाथ धोत्रे, संतोष थोटे, सुभाष भालेराव, शकिल बेग, इर्शाद बेग, अन्वर बेग, सलिम बेग, शकिल बेग, जावेद बेग, दीपक तुपे, रवी साळवे, शेख गफुर, कुंदन पाटोळे, गंगाराव पवार, अनिल कंदारे हे कोरोना योद्धा रात्रंदिवस मंठा रोडवरील गांधीनगर परिसरात उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीत कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंकार करत आहेत. आतापर्यंत ७४८ जणांवर नगरपालिकेच्या या कोरोना योद्धांनी अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांना शेवटचा निरोप या योद्ध्यांमुळे मिळत आहे.