समाजकार्याची नवी वाट, पुनर्विवाहांची गाठ!

जालन्यातील मंचाद्वारे परित्यक्ता, विधवा, विधुरांना उभारी देण्याचा प्रयत्न
Jalna social work 92 couples remarriages
Jalna social work 92 couples remarriages

जालना : कुठल्या निधीची अपेक्षा न करता पदरमोड करीत त्यांनी समाजसेवेची वेगळी वाट धुंडाळली. परित्यक्ता, विधवा, विधुर आदींच्या आयुष्यात आशेचा नवा किरण फुलविला. पुनर्विवाहाद्वारे त्यांचा अर्ध्यावरचा डाव पुन्हा पुढे सुरू केला. त्यांचा संसार उभा केला. गेल्या आठ वर्षांत अशा सुमारे ९२ जोडप्यांचे पुनर्विवाह त्यांनी लावून दिले आहेत.

ही वेगळी वाट निवडलेल्या व्यक्तीचे नाव आहे राजेश भालेकर. व्हॉट्सॲप, फेसबुक अशा समाजमाध्यमांच्या विश्वासाने आणि सकारात्मक वापर करीत त्यांनी पुनर्विवाह जणू चळवळच उभी केली. ती राज्यभर हजारो लोकांपर्यंत पोचली आहे. भालेकर फर्निचर व्यावसायिक आहेत.

समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, आपण समाजाच्या उपयोगी आले पाहिजे, या हेतूने त्यांनी प्रयत्न सुरू केले. एक पुनर्विवाह लावून देण्याचा त्यांनी केलेला पहिला प्रयत्न यशस्वी झाला. येथूनच त्यांना नवी वाट सापडली. समाजातील विधवा, विधूर, परित्यक्त्या आदींची माहिती संकलित करायला सुरवात केली. अर्थात त्यासाठी ते कसलेही शुल्क घेत नाहीत. संकलित झालेल्या यादीतून संसार अर्ध्यावरच राहिलेल्यांच्या आयुष्यात नवी उमेद देण्याचे काम सुरू केले.

सोशल मीडियावर मंच

भालेकर यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ‘सुतार समाज पुनर्विवाह मंच’ स्थापन केला. त्याद्वारे त्यांनी आतापर्यंत ९२ जोडप्यांचा पुनर्विवाह लावून दिले आहेत. या कार्याबद्दल नगर येथील विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या माध्यमातून त्यांना समाजरत्न पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

अशी सापडली दिशा

लातूर येथे आठ वर्षांपूर्वी वधू-वर परिचय मेळावा झाला होता. त्यात अनेक इच्छुकांनी परिचय करून दिला. यात एका महिलेने परिचय करून देताना लग्नानंतर एकाच वर्षात आलेल्या विधवेपणाचे दुःख मांडले. उपस्थितांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. मात्र तिचे दुःख राजेश भालेकर यांना अस्वस्थ करत गेले. तिला न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले. यातूनच पुनर्विवाह मंच स्थापन झाला.

पुनर्विवाहासाठी मेळावे

समाजमाध्यमांवरील विविध समूहांच्या माध्यमांतून येणाऱ्या परिचय पत्रांतून पुनर्विवाह मेळाव्याची संकल्पना पुढे आली. संबंधितांशी संपर्क साधून मेळाव्याची तयारी केली जाते. अशा या उपक्रमातून जालना, नाशिक, पुणे, यवतमाळ, सातारा, बीड, मालेगाव, कोल्हापूर, बुलडाणा, चंद्रपूर आदी ठिकाणी पुनर्विवाह करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती पुढे आल्याचे भालेकर सांगतात. पुनर्विवाह मंचच्या माध्यमातून अनेकजण नोंदणी करतात. लगेच विवाह जुळतात असे नाही. नोंदणीपैकी सुमारे चारशे महिला, पुरुष पुनर्विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत.

जोडले हजारो समाजबांधव

सुतार समाज पुनर्विवाह मंचच्या माध्यमांतून राज्यभर जनजागृती केली जाते. मंचचे विभागवार व्हॉट्सॲपचे दोनशे ग्रूप असून ५० हजार समाजबांधव जोडलेले आहेत. भालेकर यांची दोन फेसबुक अकाउंट असून सात हजारपेक्षा अधिक मित्र जोडले गेले आहेत.

काही वर्षांपूर्वी लातूरमधील एका वधू-वर परिचय मेळाव्यात एका विधवेने परिचय करून देताना व्यथा मांडली. मेळाव्यात तिला प्रतिसाद मिळाला नव्हता. तिची व्यथा ऐकून समाजासाठी काम करायचे ठरविले. पदरमोड करून खर्च करतो. अनेकदा अडचणी येतात. त्यावर मात करून आतापर्यंत ९२ पुनर्विवाह लावले.

- राजेश भालेकर, सुतार समाज पुनर्विवाह मंच, जालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com