कळंबच्या नगराध्यक्षांना उच्च न्यायालयाचा दिलासा
----
कळंब, ता. २२ (बातमीदार) : कळंब नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा राणी ऊर्फ सुनंदा शिवाजी कापसे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण अंतरिम दिलासा दिला आहे. नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित नमुना क्रमांक ६४ वरील देयकांच्या व्हाउचरवर नगराध्यक्षांची स्वाक्षरी आणि धनादेशांवर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षऱ्यांच्या मागणीसंदर्भात न्यायालयाने अंतरिम आदेश दिला.
न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठासमोर १९ ऑक्टोबरला सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. नगराध्यक्षा कापसे यांच्या वतीने ॲड. आशिष जाधवर यांनी युक्तिवाद केला. लोकनियुक्त नगराध्यक्षांना नगर परिषदेच्या आर्थिक निर्णयप्रक्रियेतून बाजूला ठेवता येणार नाही, तसेच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला. नमुना क्रमांक ६४ वरील देयकांच्या व्हाउचरवर नगराध्यक्षांची स्वाक्षरी आणि धनादेशांवर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षऱ्यांबाबत अंतरिम व्यवस्था लागू राहणार आहे. या आदेशामुळे नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारांतील नगराध्यक्षांच्या अधिकारांचा मुद्दा चर्चेत आला असून, पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.