Aurnagabad : कांचनवाडीचा प्रकल्प गॅसवर ; कचरा प्रक्रिया कंत्राटदाराला नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांचनवाडीचा प्रकल्प गॅसवर ; कचरा प्रक्रिया  कंत्राटदाराला नोटीस

कांचनवाडीचा प्रकल्प गॅसवर ; कचरा प्रक्रिया कंत्राटदाराला नोटीस

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून गाजत आहे. राज्य शासनाच्या निधीतून महापालिकेने चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता; पण यातील केवळ दोनच प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. कांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून बायोमिथेनेशन गॅस तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाचे जानेवारी महिन्यात उद्घाटन झाले असले अद्याप प्रकल्पातून गॅस बाहेर येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रकल्प का कार्यान्वित झाला नाही? अशी विचारणा करत महापालिकेने बँको या कंत्राटदाराला नोटीस बजावली असल्याचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले.

शहरातील कचराकुंडीनंतर राज्य सरकार महापालिकेच्या मदतीला धावून आले होते. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेचा १४८ कोटी रुपयांच्या डीपाआरला मंजुरी दिली होती. त्यानुसार महापालिकेने हर्सूल, चिकलठाणा, कांचनवाडी आणि पडेगाव येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. यातील पडेगाव व चिकलठाणा येथील प्रकल्प सध्या सुरू आहेत. मात्र हर्सूलचा १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. या प्रकल्पासाठी अद्याप जागा मिळालेली नाही. तसेच कांचनवाडी येथे ३० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यापासून गॅस तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

मात्र अद्याप या प्रकल्पातून गॅस निर्मिती होऊ शकलेली नाही. घन कचरा व्यवस्थापन विभागाचे तत्कालीन प्रमुख तथा सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांनी वारंवार या प्रकल्पाचा आढावा घेतला पण प्रकल्प सुरू करण्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान त्यांची बदली झाल्यानंतर प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी उपायुक्त सौरभ जोशी यांच्याकडे सोपविली आहे. त्यांनी नुकताच कचरा प्रक्रिया प्रकल्पांचा आढावा घेतला. सोमवारी (ता. १६) कांचनवाडी येथील कंत्राटदारासोबत त्यांनी बैठक घेतली. त्यात प्रकल्प तत्काळ कार्यान्वित करा, अशी सूचना करण्यात आली. तसेच आतापर्यंत प्रकल्प का कार्यान्वित झाला नाही, याचा तीन दिवसांत खुलासा करावा, अशी नोटीस कंत्राटदाराला बजावली आहे, असे उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले.

तयार गॅस जातो कुठे?

या प्रकल्पाचे ट्रायल घेण्यात आले. ओल्या कचऱ्यापासून तयार होणार गॅस साठविण्यासाठी मोठी टाकी आहे. ती टाकी गॅसने भरलेली आहे. पण त्या गॅसचा वापर अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे तयार गॅस जातो कुठे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

loading image
go to top