कन्नड घाट जड वाहतुकीसाठी बंद | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : कन्नड घाट जड वाहतुकीसाठी बंद

औरंगाबाद : कन्नड घाट जड वाहतुकीसाठी बंद

कन्नड : वाहतुकीसाठी बंद ठेवलेला औट्रम घाटातील रस्ता तब्बल अडीच महिन्यानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, घाटात वाळूचे ट्रक बंद पडल्याने जवळपास ७२ तास वाहतूक खोळंबली होती. येथील संभाव्य धोका लक्षात घेता जीवित हानी टाळण्यासाठी हा रस्ता पुन्हा जड वाहतुकीसाठी बुधवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपासून बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी दिले आहे.

यासंदर्भात श्री काळे यांनी औरंगाबाद, जळगाव, धुळे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात नमूद केले की, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळून रस्ता खचला होता. त्यानंतर घाटातील रस्ता युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, वाहतूकदार व नागरिकांच्या दबावामुळे काम सुरु असतानाच प्रशासनाला हा रस्ता मंगळवारी (ता.९) खुला करावा लागला होता.

विशेष म्हणजे रस्त्याचे काम करणारे ठेकेदार राज पुन्शी यांनी काम अपूर्ण असल्याने केवळ एकेही वाहतूक करावी, वाहने हळू चालवावी अन्यथा पुन्हा वाहतूक कोंडी होईल असा इशाराही दिला होता. मात्र, तरीही जड वाहतूक सुरु होती. दोन दिवसांपूर्वी वाळूचे दोन ट्रक घाटात बंद पडल्याने अनेक प्रवासी घाटात अडकून पडले. त्यामुळे हा घाटरस्ता तीन मिटर पेक्षा अधिक उंचीच्या वाहनांसाठी १७ नोव्हेंबर सकाळी आठ ते रविवार २१ १७ नोव्हेंबर २०२१ रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत, अशी माहिती पुन्शी यांनी दिली.

loading image
go to top