esakal | सात हजार नागरिकांवर कारवाई, पोलिसांनी आकारला वीस लाखांचा दंड

बोलून बातमी शोधा

null
सात हजार नागरिकांवर कारवाई, पोलिसांनी आकारला वीस लाखांचा दंड
sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव थांबवण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात ता. एक ते १७ एप्रिल या सतरा दिवसांत पोलिसांनी सहा हजार ९२८ जणांवर कारवाई करून २० लाख १७ हजार १०० रुपये दंड वसूल केला आहे. इतकेच नव्हे तर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची ॲन्टीजेन टेस्ट करण्याचा उपक्रमही हाती घेतला आहे. यात आतापर्यंत बारा जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले असून, त्यांची रवानगी कोविड केअर सेंटरला करण्यात आली आहे.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच सुरक्षित राहणे गरजेचे आहे. पण, नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांवर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय हिबारे, पोलिस निरीक्षक सुनील पुजारी आदी शहरातील पोलिस अधिकाऱ्यांकडून ही कारवाई केली जात आहे. अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव हे रस्त्यावर उतरून कारवाई करीत आहे. यातून सतरा दिवसांत सहा हजार ९१८ जणांवर कारवाई करून २० लाख १७ हजार १०० रुपये दंड वसूल केला आहे.

दीड हजार केसेस विनामास्कच्या : या कारवाईत विनामास्क असलेल्या एक हजार ६६४ जणांवर कारवाई करून दोन लाख सहा हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ११८ आस्थापनांवर कारवाई करून दोन लाख ४५हजार ९०० रुपये दंड केला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८६ जणावर कारवाई करून ५२ हजार ३०० दंड आकारला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार पाच हजार ६० केसेस करण्यात आल्या असून १५ लाख १२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. २३२ वाहने जिटेन करण्यात आली आहेत.

२६९ जणांच्या ॲन्टीजेन : रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची ॲन्टीजेन टेस्ट केली जात आहे. यात पोलिसांनी २६९ जणांच्या ॲन्टीजेन टेस्ट केल्या. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे सर्व सुपरस्प्रेडर होते. त्यांना तातडीने कोविड केअर सेंटरला भरती करण्यात आले आहे.

आकडे बोलतात...

पोलिस ठाण्याचे नाव-----एकूण केसेस--------आकारलेला दंड

गांधी चौक-------------------१३८३---------------३,७६,९००

शिवाजीनगर -----------------७६१--------------२,६०,६००

विवेकानंद चौक---------------७४८---------------१,६०,९००

एमआयडीसी------------------१२४४------------३,२५,६००

वाहतूक नियंत्रण शाखा-------२७९२------------८,९३,१००

----

एकूण------------------------६,९२८--------------२०,१७,१००