esakal | ओळखीचा वाढप्या अन् रेमडेसिव्हिरचा तुडवडा, लातूरसाठी दहा हजार इंजेक्शन्सची नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir.jpg

ओळखीचा वाढप्या अन् रेमडेसिव्हिरचा तुडवडा, लातूरसाठी दहा हजार इंजेक्शन्सची नोंदणी

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे त्यांच्या अनेक भाषणातून ‘वाढप्या ओळखीचा असला पाहिजे’, असे म्हणायचे. त्यांच्या या विधानाची मनातून आठवण सध्या लातूरकरांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे येत आहे. जालना जिल्ह्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दहा हजार इंजेक्शनच्या वाटपाला सुरवात केली आणि लातूर जिल्ह्यात रेमडेसिव्हिरसाठी त्याच्या वापरावरच बोट ठेवले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यासाठीही दहा हजार इंजेक्शन्सची नोंदणी केली असून लवकरच ते उपलब्ध होण्याची आशा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केली. पंगतीत भोजन वाढणारा अर्थात वाढप्या ओळखीचा असल्यास तो कमी पडणार नाही, याची काळजी घेतो. याप्रमाणे सरकार दरबारी ओळखीची व्यक्ती असेल तर सरकारच्या विविध योजनांचा लाभ न मागताही होतो.

याच पद्धतीने अनेक भाषणांतून विलासराव देशमुख हे वाढप्या ओळखीचा असला पाहिजे, याची जाणीव करून देऊन मी असल्यामुळे जिल्ह्याला न मागताही अनेक गोष्टी मिळतात, असे ते आवर्जून सांगत. त्यांच्या या वाक्याची लातूरकरांना काही दिवसापासून सातत्याने आठवण येत आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा असताना तो कमी करण्यासाठी काहीच प्रयत्न होत नसल्याने लातूकरांना साहेबांच्या ‘त्या’ वाक्याची आठवण येत आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी रात्रंदिवस भटकंती करीत आहेत. विविध ठिकाणी वशिले लाऊन इंजेक्शन उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच गुरुवारी (ता. १५) जालना येथे आरोग्यमंत्री टोपे यांनी दहा हजार रेमडेसिव्हिरच्या वाटपाला सुरवात केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. जालन्यासाठी टोपे हे ओळखीचा वाढप्या ठरले. लातूरकरांना मात्र, ओळखीचा वाढप्या नसल्याची खंत आहे. दरम्यान, गुरुवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आढावा बैठकीतूनच अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी मोबाईलवरून रेमडेसिव्हिर तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

टोपे- देशमुखांच्या वादाचीही चर्चा

जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीवरून देशमुख व टोपे यांच्यात वादाची ठिणगी पडली. जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देशमुख यांनी उस्मानाबादला नेल्याचाही आरोप घडून आला. या वादाचा परिणाम जिल्ह्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या उपलब्धतेवर झाल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळातील अन्य मंत्रीही जालना जिल्ह्यात सर्वांत आधी रेमडेसिव्हिरच्या उपलब्धतेमुळे नाराज असल्याचेही सांगण्यात येत आहे.

लातूरसाठी दहा हजार इंजेक्शन

रेमडेसिव्हिरचा तुटवडा कमी करण्यासाठी खास मराठवाड्यासाठी एक लाख दहा हजार इंजेक्शनचा साठा मंजूर झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यात अन्य जिल्ह्याप्रमाणे लातूरसाठी दहा हजारहून अधिक इंजेक्शन मंजूर झाले असून, त्याची पूर्ण रक्कम भरून मागणी नोंदवण्यात आली आहे. दोन दिवसांत हे इंजेक्शन येण्यास सुरवात होतील. यामुळे लवकरच इंजेक्शनचा तुटवडा कमी होणार असून जिल्ह्यात गरजू रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगितले.