लातूर : शहरात दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्या परिधान केलेले दुचाकीचालक.
ऐन पावसाळ्यात लातूरकरांना उन्हाचा चटका
------
वातावरणात वाढला उकाडा; दमदार पावसाकडे लक्ष
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ११ : पावसाने सर्वत्र पाठ फिरवली असून, जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाळ्याचे दिवस सुरू असताना लातूर शहरासह जिल्ह्यात चक्क उन्हाचा चटका जाणवत आहे. सप्टेंबर महिन्यात तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. त्यामुळे पावसाळ्यातील गारवा कमी होऊन उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचा सध्या अनुभव येत आहे. त्यामुळेच दुपारच्या सत्रात टोप्या, उपरणे, गॉगल जवळ बाळगण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे.
दुपारच्यावेळी ज्येष्ठ, महिला, लहान मुलांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. आज लातूर शहरातील बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट जाणवत होता. उकाड्यामुळे ऐन पावसाळ्यात पंखे, कूलर लावण्याची वेळ आली आहे.
पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेतही भर पडत आहे. खरीप पिकांना सध्या पाण्याची गरज असताना पावसाअभावी पिकांनी माना टाकायला सुरवात केली आहे. अनेक ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिके करपून गेली आहेत. यंदाच्या मोसमात लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस येईल, अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.