ऑरिक सिटीला समृध्दी महामार्गाशी जोडल्यास गुंतवणूकीत वाढ; उदय सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Linking Auric City to Prosperity Highway will increase investment Uday Samant aurangabad

ऑरिक सिटीला समृध्दी महामार्गाशी जोडल्यास गुंतवणूकीत वाढ; उदय सामंत   

औरंगाबाद : ऑरिक सिटीमध्ये अनेक उद्योजक गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. समृद्धी महामार्ग ऑरिकशी जोडावा, ऑरिक सिटीमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन करावे, ट्रक टर्मिनल उभारावे, रहिवासी वसाहतींमधील समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. ऑरिक सिटीला उद्योगमंत्र्यांनी शुक्रवारी (ता.२१) भेट देऊन येथील उद्योजक तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. बैठकीपूर्वी जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या महा एक्स्पोबाबत मसिआच्या पदाधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करून नियोजनाची माहिती घेतली.

यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल, ऑरिकचे सहसंचालक काकुस्ते तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
पैठण, वैजापूर तसेच करमाड परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उद्योगमंत्री म्हणाले, की उद्योजक आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवावा, इतर काही समस्या असल्यास तसा प्रस्ताव पाठवावा. त्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी दिवाळीनंतर मुंबईत बैठक घेण्यात येईल.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पैठण एमआयडीसीतील समस्या उद्योगमंत्र्यांना सांगितल्या. गेवराई तांडा ते वाळूज रस्ता बनविल्यास या क्षेत्रातील उद्योगांना भरारी मिळणार असल्याने यावर तातडीने कार्यवाही करावी, उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरी द्यावी तसेच सीएसआर हा जिल्ह्यातील विकासकामांसाठी खर्च करण्यासाठी उद्योजकांना सूचित करण्याची विनंती देखील उद्योगमंत्र्यांना केली.