जबरदस्तीने वसुली
नको, अन्यथा कठोर कारवाई
-----
अग्रणी बॅंकेच्या अधिकाऱ्यांची माहिती
-------
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २७ ः जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता खासगी सावकारी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील पाच ते सहा महिने (मार्चपर्यंत) मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी बळजोरी करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
दुष्काळी स्थिती पाहता कर्जवसुलीची प्रक्रिया अत्यंत मवाळ पद्धतीने करावी. जे शेतकरी व ग्राहक पैसे देऊ शकतात, त्यांच्याकडून घ्यावे. मात्र, जे देऊ शकत नाहीत त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये. वसुली एजंट्सनी कोणत्याही शेतकऱ्याच्या किंवा ग्राहकाच्या घरासमोर दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू नये. दोन-तीन तास घरी बसून अनावश्यक मानसिक दबाव निर्माण करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. जर मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आपल्या वसुलीच्या पद्धतीत बदल केला नाही, तर कठोर कारवाई केली जाईल आणि संबंधितांचे परवानेदेखील जप्त करण्यात येऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी मार्चपर्यंत वसुलीसाठी सक्ती न करता नरमाईची भूमिका घ्यावी आणि महिला भगिनी व शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक कुमुद रंजन पांडा यांनी दिली.