कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीला सात कोटींचे नुकसान | Aurngabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीला सात कोटींचे नुकसान

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला मोठा फटका बसत आहे. औरंगाबाद विभागाला दररोज पन्नास लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत तब्बल सहा ते सात कोटींपेक्षा अधिक फटका बसला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून संप सुरू केला आहे. सुरवातीला महामंडळाने प्राथमिक मागण्या मान्य केल्यामुळे एसटी कृती समितीने संप मागे घेतला. विलीनीकरणाची मागणी दुसऱ्या टप्प्यात हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून मागणी करण्याचे ठरले होते.

मात्र काही आगारांमध्ये कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम राहिले, त्यामुळे मिटलेला संप पुन्हा चिघळण्यास सुरवात झाली. कृती समितीच्या नेत्यांचीही चांगलीच पंचायत झालेली आहे. दरम्यानच्या काळात हा विषय उच्च न्यायालयात गेलेला आहे. सरकारनेही संप मागे घेण्याची विनंती वारंवार केलेली आहे. प्रशासनाने हा तिढा सोडवण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दररोज कर्मचारी निलंबित करण्यात येत आहेत, तर रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटीस बजावण्यात येत आहे. एकूणच परिस्थितीत चांगलेच वातावरण तापलेले आहे.

वाढते नुकसान

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभर एसटीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहेत. औरंगाबाद विभागात ५३० बसगाड्या आहेत. तर दोन हजार ९०० कर्मचारी कार्यरत आहेत. दररोज साधारण ५० लाख रुपयांचा फटका बसत असल्याने गेल्या पंधरा दिवसांत साधारण सहा ते सात कोटी रुपयांचे महामंडळाचे औरंगाबाद विभागाचे नुकसान झाले आहे.

loading image
go to top