Crime News : विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या; हत्येची माहिती व्हॉट्सअपवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Love crime news aurangabad lover killed girlfriend marriage issue police arrested

विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या; हत्येची माहिती व्हॉट्सअपवर

औरंगाबाद : लग्नाचा तगादा लावणाऱ्या विवाहित प्रेयसीचा विवाहित तरुणाने गळा चिरून मृतदेहाचे तुकडे तुकडे केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता.१७) सकाळी एन-११, हडको परिसरात उघडकीस आली. विशेष म्हणजे, तुकडे केलेले अवयव गोणीत भरून कारमधून पळून जात असताना दुपारी देवगाव रंगारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला सिडको पोलिसांच्या हवाली करण्यात आले. सौरभ बंडोपंत लाखे (३५, रा. शिऊर, ता. वैजापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर अंकिता श्रीवास्तव (२१ वर्षे, रा. जालना) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृत अंकिताचा विवाह महेश श्रीवास्तव (शिऊर, ता. वैजापूर) यांच्याशी झाला होता. त्यांना साडेतीन वर्षांची मुलगी आहे. आरोपी सौरभ हा अंकिताच्या शेजारीच राहत होता, तोदेखील विवाहित असून त्याला तीन वर्षांची एक मुलगी आहे. सौरभ हा काही दिवसांपूर्वी मुद्रित माध्यमात पत्रकार म्हणून काम करत होता. काही दिवसांपासून त्याने स्वत:चे साप्ताहिक काढले असून तो यूट्यूबसाठीही काम करतो. सौरभ आणि मृत अंकिता या दोघांची ओळख झाली होती, दरम्यानच्या काळात त्याने ओळखीतून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते.

अंकिता विवाहित असली तरी पती-पत्नी सोबत राहत नव्हते. दरम्यान, सौरभने तिला हडको परिसरात भाड्याने खोली घेऊन दिली होती. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास भाडेकरूने घरमालकाला फोनवर खालच्या खोलीतून दुर्गंधी येत असून तेथे माशाही आहेत आणि बाहेरून कुलूप असून तुम्ही तत्काळ, या असे सांगितले. त्याच घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या इतर भाडेकरूंनी त्याला विचारले होते, मात्र तो उडवाउडवीचे उत्तर देत निघून गेला. इतरांना संशय आला, मात्र कोणी विचारण्याचे धाडस केले नाही. मात्र, एक भाडेकरू आणि परिसरातील बेकरीचालकाने पोलिसांसह घरमालकाला कळविले, तोपर्यंत कार शहराबाहेर गेली होती. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, सिडकोचे निरीक्षक संभाजी पवार, निरीक्षक सलगरकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव आदींनी घटनास्थळी तातडीने भेट दिली.

ग्रामीण पोलिसांची तत्परता

सिडको पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ ग्रामीण पोलिसांना कळवले, त्यामुळे देवगाव रंगारी परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करताच आरोपी सौरभ जात असलेली कार (एमएच २०, सीएच ३०७६) पकडली. कारमध्ये सौरभ लाखेसह त्याचा कारचालक मित्र होता. पोलिसांनी कारची झडती घेतली असता अंकिताच्या मृतदेहाचे तुकडे गोणीत भरलेले आढळून आले.

व्हॉट्सॲपवर दिली खबर

आरोपी सौरभ लाखे हा जिल्हा पोलिस-पत्रकाराच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर नेहमीच सक्रिय असायचा. बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजताही त्याने स्वत: ‘मी खून केला आहे’ अशी व्हॉट्सॲपवर पोस्ट टाकली. सुरुवातीला इतर पत्रकारांना आणि पोलिसांना काही समजले नाही, मात्र पोलिसांना त्याला विचारणा केली असता, आपण सिडको पोलिस ठाण्यात जात असल्याचे त्याने ग्रूपवर पोस्ट केले, मात्र १२ः२५ दरम्यान त्याने पुन्हा आपण देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात असल्याची पोस्ट टाकली.

डायरी आणि चाकू सापडला

धारदार शस्त्राने त्याने अंकिताचा गळा कापल्यानंतर घर रक्ताने माखले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तिथून पोलिसांनी एक डायरी आणि चाकू जप्त केला. अंकिताने डायरीमध्ये नातेवाइकांपासून दूर गेल्यानंतर काय भावना होतात, काय वाटते याबद्दल आठ-दहा पाने मजकूर लिहिलेला आहे. तसेच सौरभवरचे प्रेम याविषयीही काही मजकूर लिहिलेला असून पोलिसांनी डायरीत लिहिलेला मजकूर मात्र गुप्त ठेवला आहे. रात्री उशिरा आरोपी सौरभ आणि कारचालक सुनील गंगाधर धनेधर (२५, रा. शिरुर) या दोघांना सिडको ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरा अटक करण्यात आली असून गुरुवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, निरीक्षक विनोद सलगरकर, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, ज्ञानेश्वर अवघड, उपनिरीक्षक रमेश राठोड, पोलिस अधिकारी विजयानंद गवळी आदी तपास करीत आहेत.

असा झाला प्रेमकथेचा शेवट

यासंदर्भात पोलिस सूत्रांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांपासून मृत अंकिता आणि आरोपी सौरभ यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, कारण दोघेही विवाहित असले तरी ते एकमेकांच्या शेजारी राहत होते. काही महिन्यांपूर्वी अंकिता घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शिरूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले होते, मात्र त्यानंतर ती पुन्हा गायब झाली, त्यानंतर दुसऱ्यांदाही बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. दरम्यान, अंकिता आणि सौरभ यांनी येथील हडकोत घर भाड्याने घेतले होते, याठिकाणी १५ ऑगस्टरोजी अंकिताचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली. सौरभने अंकिताचा खून केल्याची कबुली दिली असली तरी तिने लग्नाचा तगादा लावल्याने खून केल्याचे कारण त्याने दिले आहे; परंतु रात्री उशिरापर्यंत त्याने स्पष्ट सांगितले नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्याची चौकशी करत होते. विशेष म्हणजे अंकिता आणि सौरभ यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा गावापर्यंत आणि नातेवाइकांपर्यंत पोचली होती, त्यामुळे दोघांच्या कुटुंबात वाद सुरू झाल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत दोघे हडकोत राहू लागले होते. तो कधी औरंगाबादेत तर कधी गावी जात असे, त्याचदरम्यान तिने त्याच्याशी लग्नाचा तगादा लावला, अशा स्थितीत सौरभला चारित्र्यावर संशय येऊ लागला, हेही हत्या करण्याचे कारण असावे असा कयास पोलिसांनी बांधला आहे.

तिचे डोके कापून गावी गोदामात ठेवून आला होता!

सौरभने १५ ऑगस्टच्या रात्री अंकिताचा गळा चिरल्यानंतर तिचे शिर धडावेगळे करत हात, पाय, डोकेही तोडून ठेवले. सर्व अवयव गोणीत भरून दुचाकीवर हडकोतून शिऊरला नेत तेथे एका गोदामात लपवून ठेवले. बुधवारी तो इतर अवयवांचे तुकडे गोणीत भरून कारने जाताना त्याला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी सर्व अवयव सायंकाळी शवविच्छेदनासाठी घाटीत पाठविले.

Web Title: Love Crime News Aurangabad Lover Killed Girlfriend Marriage Issue Police Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..