आधार प्रमाणीकरण नसेल तर सिलिंडरचे बुकिंग नाही!
----
ई-केवायसीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत, मिळणार नाही अनुदानाचा लाभ
---
छत्रपती संभाजीनगर, ता. २१ : घरगुती एलपीजी सिलिंडरवरील शासकीय अनुदानाचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले. येत्या १ ऑक्टोबरपासून ज्या ग्राहकांचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण असेल, त्यांनाच सवलतीच्या दरात आणि सबसिडीसह सिलिंडर बुक करता येईल. ज्या ग्राहकांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तत्काळ पूर्ण करावी. परंतु, ज्यांनी पूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना ती पुन्हा करण्याची गरज नाही, असे आवाहन गॅस वितरण कंपन्यांनी केले आहे.
देशभरात १९ सप्टेंबरपर्यंत २७.४३ कोटी सक्रिय ग्राहकांनी ही प्रक्रिया आधीच पूर्ण केली. हे प्रमाण ८९.९ टक्के आहे. ज्या ग्राहकांनी हे प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, त्यांचा सिलिंडर पुरवठा सुरळीत सुरू राहील. मात्र, उर्वरित ग्राहकांनी १ ऑक्टोबरपूर्वी हे काम पूर्ण न केल्यास त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागेल, असे हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपी), इंडियन ऑइल (इंडेन) आणि भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) या कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
----
मोजावे लागतील २१० रुपये जास्त
घरगुती वापरासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानित सिलिंडरचा हॉटेल किंवा इतर व्यावसायिक कारणांसाठी होणारा गैरवापर रोखणे, बनावट तसेच दुबार गॅस जोडण्या रद्द करणे आणि सबसिडीचा लाभ थेट गरजू आणि पात्र कुटुंबांपर्यंत पोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, प्रति १४.२ किलो सिलिंडरमागे शासन सुमारे २१० रुपयांचे अप्रत्यक्ष अनुदान देत आहे.
---
प्रमाणीकरण कसे कराल? हे आहेत ३ सोपे पर्याय :
१. सिलिंडर पोचवण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे जागेवरच बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
२. ग्राहक आपल्या जवळच्या गॅस वितरकाच्या शोरूममध्ये जाऊन थेट बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करू शकतात.
३. ग्राहकांना स्वतःच्या स्मार्टफोनवरून खालील अधिकृत ॲप्सचा वापर करून ई-केवायसी पूर्ण करता येईल.
----
इंडेन ग्राहकांसाठी : इंडियन ऑइल वन ॲप
भारत गॅस ग्राहकांसाठी : हॅलो बीपीसीएल ॲप
एचपी गॅस ग्राहकांसाठी : एचपी पे ॲप
या प्रक्रियेचे मार्गदर्शन व्हिडिओ ‘पीएमयूवाय’ पोर्टलवर उपलब्ध आहेत.
---
प्रमाणीकरण न केल्यास काय होईल?
जे ग्राहक हे बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करणार नाहीत त्यांना सबसिडीचा लाभ मिळणार नाही. शिवाय ऐनवेळी सिलिंडरचे ऑनलाइन बुकिंग स्वीकारले जाणार नाही किंवा डिलिव्हरी रद्द होऊ शकते. अशा ग्राहकांना तेल कंपन्यांच्या उपलब्धतेनुसार ५ किलो किंवा १० किलोचे सिलिंडर कोणत्याही अनुदानाशिवाय, पूर्ण बाजारभावानुसार खरेदी करावे लागतील.
---
अधिक माहिती व मदतीसाठी संपर्क
एलपीजी प्रमाणीकरण किंवा बुकिंग संदर्भात कोणत्याही मदतीसाठी ग्राहक १८०० २३३३ ५५५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.