Lavani Queen Madhu Kambikar’s Journey From a Village Stage to Maharashtra’s Folk Art Scene
esakal
मार्गशीर्षातील गोठवणारी थंडी, पेटत्या मशाली आणि बत्त्यांच्या भुरभुरत्या उजेडात माळेगावच्या खंडोबाची उसळलेली यात्रा... यात्रेचा खरा जीव म्हणजे गावच्या वेशीला खेटून असलेल्या मोकळ्या पटांगणात गावकरी स्वतः हौसेने बसवायची ती नाटकं. त्याकाळी ‘शिवबाचा छावा’, ‘वीर सेन मंजिरी’ यांसारख्या नाटकांचे फड रंगायचे. अशाच यात्रेच्या एका रात्री मोठ्यांनी बसविलेल्या नाटकामध्ये अवघ्या दहा वर्षांच्या एका चिमुरडीने रंगमंचावर पाऊल ठेवले. तिने संवादफेक आणि नजरेतील चुणूक दाखवून अख्खे पटांगण खिळवून ठेवले. त्या नाटकातूनच पुढे त्यांचे नाव झाले. नंतर त्याकाळच्या जलसा पार्टी, लावणी असे करत त्या थेट बीडच्या मोंढ्यातल्या कुसुम निरलेकर यांच्या थिएटरमध्ये काम करू लागल्या. आम्ही तिथे त्यांची कला बघायला जायचो, अशी आठवण माळेगाव खुर्द (ता. गेवराई, जि. बीड) येथील ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद खरात आजही तितक्याच अभिमानाने सांगतात.