परिचारिकांच्या कायमस्वरूपी भरतीच्या लढ्याला यश
३,९११ पदांची जाहिरात प्रसिद्ध, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा पाठपुरावा यशस्वी
घाटी परिसर, ८ ः राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील अधिपरिचारिकांची रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, मुख्यालय लातूरने सुरू केलेल्या दीर्घ संघर्षाला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिपरिचारिकांची ३,९११ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२०२२ पासून संघटनेने कंत्राटी भरतीला विरोध करीत नियमित पदभरतीसाठी आंदोलने, निवेदने आणि मंत्रालयीन बैठकांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. मे २०२२ मध्ये दहा दिवसांचे बेमुदत आंदोलन केले होते. त्यानंतर २०२३-२४ मध्ये सुमारे ४,२०० परिचारिकांची कायमस्वरूपी भरती झाली. मात्र, रिक्त पदांचा प्रश्न कायम असल्याने संघटनेने २०२५ मध्येही आंदोलन केले. जुलै २०२५ मध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कायमस्वरूपी भरतीसाठी कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते. मे २०२६ मध्ये मुंबईतील आझाद मैदानावरही तीन दिवस आंदोलन केले होते. संघटनेच्या राज्याध्यक्षा सुमित्रा तोटे, राज्यसरचिटणीस भीमा चक्रे, अरुण कदम यांच्यासह राज्य व शाखा पदाधिकारी आणि सभासदांनी या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. भरती प्रक्रियेतील ८०:२० स्त्री-पुरुष प्रमाणाची अट रद्द करावी, उर्वरित ७५० पदे आणि अतिरिक्त खाटांसाठी आवश्यक मनुष्यबळ मंजूर करावे, अशी संघटनेची मागणी कायम आहे. पात्र उमेदवारांना नियुक्त्या मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.