Maratha Reservation : आरक्षणासाठी माजलगावच्या युवकाने वाळूजमध्ये संपवले जीवन

बारावी उत्तीर्ण दत्ता हा पाच महिन्यांपूर्वी माजलगावहून कामाच्या शोधात वाळूज येथे आला.
Maratha Reservation
Maratha ReservationSakal

वाळूज महानगर/माजलगाव : मराठा आरक्षण आणि बँकेच्या थकीत कर्जामुळे नैराश्यातून ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. दत्ता कालिदास महिपाल (रा. शिंदेवाडी, ता. माजलगाव, जि. बीड) असे त्याचे नाव आहे.

बारावी उत्तीर्ण दत्ता हा पाच महिन्यांपूर्वी माजलगावहून कामाच्या शोधात वाळूज येथे आला. तो कृष्णा पवार याच्या समवेत वडगाव (को.) परिसरात भाड्याने एका रूममध्ये राहत होता. हे दोघेही खासगी कंपनीमध्ये काम करत होते.

मंगळवारी पवार हा रात्रपाळीला गेला होता. तर दत्ता हा घरीच होता. दरम्यान, रात्री भाऊ महेश महिपाल याला दत्ताने ‘घेतलेले कर्ज न फेडल्याने बँकेतून फोन येतात आणि दुसरीकडे मराठा आरक्षण मिळत नाही, त्यामुळे आत्महत्या करत आहे’, असा व्हॉट्सअपवर मेसेज केला. महेशने सकाळी ६.३० च्या दरम्यान हा मेसेज पहिला.

त्याने तत्काळ फोन करून वडगाव कोल्हाटी येथे राहत असलेले अशोक सुरवसे यांना दत्ताच्या रूमवर पाठविले. मात्र, तोवर दत्ताने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वाळूज एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविला. घटनेची वाळूज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून रात्री त्याच्या मूळगावी शिंदेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील व पदवीधर लहान भाऊ महेश असा परिवार आहे.

काय लिहिले होते चिठ्ठीत?

‘‘काही कारणास्तव फाशी घेत आहे. गोपाळ अर्बन माजलगाव या बँकेतून मी १ लाख रुपये घेतले होते. पण काही कारणानुसार काही हप्ते भरले नाही. रोज फोन येत होते. त्यामुळे मला खूप त्रास झाला. मोठे बिजनेसवाले कर्ज घेतात व न भरता पळून जातात. विजय माल्या असेल किंवा निरव मोदी असेल. त्यांना कोणी काही बोलत नाही.

पण शेतकऱ्यांनाच सर्व बोलतात. दुसरे कारण मराठा आरक्षण मिळत नाही. कारण काय आहे? मी उपोषण करून काय फायदा झाला नाही. सरकारने त्याची भरपाई करावी. (सॉरी मम्मी, पप्पा, सुखी रहा.) तुमचा दत्ता.’’ असा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिला असून त्यावर सही आहे.

मराठा आरक्षणासाठी पाच दिवस बेमुदत उपोषण

दत्ता महिपाल याने यापूर्वीही वाळूज महानगरमध्ये खासगी कंपनीत काम केले होते. कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये माजलगाव येथे येऊन व्यवसाय सुरू केला होता. पण तो अयशस्वी राहिला. गोपाळ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून कर्ज घेतले होते.

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात सलग पाच दिवस उपोषणही केले होते. पण आरक्षणप्रश्न मार्गी लागत नसल्याने आलेल्या नैराश्यातून दत्ताने टोकाचे पाऊल उचलले.

दत्ता महिपाल यांनी आमच्या बॅंकेकडून कर्ज घेतल्याबाबत व थकीत असल्याबाबतची मला माहिती घेऊन सांगता येईल. मी नातेवाइकांसोबत दवाखान्यामध्ये आलेलो आहे.

- विनोद गोपाळ, अध्यक्ष, गोपाळ अर्बन सोसायटी, माजलगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com