
मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत मला तरी शिक्षणमंत्री करा! जालन्याच्या युवकाचे थेट CM ना साकडे
औरंगाबाद : सत्ताबदल होऊन महिना लोटला तरी मंत्रिमंडळ दोघांचेच आहे. दोन-चार निर्णय वगळता इतर विभागांचे कामकाज बंद असल्यात जमा आहे. याचा फटका शिक्षण विभागालाही बसला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा होईल, तोपर्यंत शालेय शिक्षणमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार माझ्याकडे तरी द्यावा, अशी मागणीच जालन्याच्या संतोष मगर या युवकाने थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याची आता चांगलीच चर्चा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ शपथ घेतली. तेव्हापासून आत्तापर्यंत केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोन मंत्र्यांव्यतिरिक्त सर्व मंत्रिपदे रिक्त आहेत.
त्यामुळे सर्व विभागाचे कामकाज ठप्प आहे. शालेय शिक्षण विभाग हा त्यापैकी एक महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाच्या समस्या जटिल आहेत. तसेच या विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक समस्या या वर्षानुवर्षे तशाच आहेत. २०१७ पासूनची शिक्षकभरती अजूनदेखील पूर्ण झाली नाही. त्यातच ५ वर्षांपासून शिक्षक भरती नसल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्यात अनेक वर्षापासून विनाअनुदानित शाळा-शिक्षकांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यातच मागील काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असल्याने शिक्षण विभागाच्या समस्यांमध्ये वाढ झालेली आहे. या समस्या सुटणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मला समाजसेवेच्या भावनेतून शालेय शिक्षणमंत्री पदाचा कार्यभार द्यावा, असे मगर यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही निवेदन दिले आहे.
मी डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी काम करत आहे. शिक्षण विभागातील समस्यांची मला जाण असल्याने शिक्षणमंत्रिपदाला योग्य न्याय देवू शकतो. आपण एक संवेदनशील मुख्यमंत्री असल्याने माझ्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी द्यावी.
- संतोष मगर
Web Title: Make Me Education Minister Until Cabinet Expansion Jalana Youth Send Letter To Cm Eknath Shinde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..