आंध्रातून ४० किलो गांजा मागविणारा अखेर अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंध्रातून ४० किलो गांजा  मागविणारा अखेर अटकेत
आंध्रातून गांजा मागविणारा दीड महिन्यांनी अटकेत

औरंगाबाद : आंध्रातून ४० किलो गांजा मागविणारा अखेर अटकेत

औरंगाबाद : आंध्र प्रदेशातून अवैधरीत्या गांजा मागविणाऱ्या नेवासा तालुक्यातील संशयित आरोपीला उस्मानपुरा पोलिसांनी मंगळवारी (ता.२३) बेड्या ठोकल्या. दिनकर त्र्यंबक तुपे (रा. बऱ्हाणपूर, ता. नेवासा, जि. नगर) असे त्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे तुपे याने आंध्रातून गांजा मागविल्यानंतर विशाखापट्टणमच्या दोन महिला आणि एक पुरुष अशा तिघांनी ४० किलो गांजा रेल्वेने औरंगाबादेत आणला होता, त्या तिघांना स्थानकावरच पोलिसांनी जेरबंद केले होते. ते तिघेही आरोपी सध्या कारागृहात आहेत. तर गांजा मागविणाऱ्यास दीड महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

यासंदर्भात उस्मानपुरा ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रातून महाराष्ट्रात अवैधपणे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या गोविंदा मनी आरली (३८), लाऊ अम्मा रामू आरली (४०) आणि मनय्या अप्पाराव पिल्ले (३०, तिघेही रा. तोडवा, नलंका पिल्ली, विशाखापट्टणम) या तिघांच्या टोळीला विशेष पथकाचे सूर्यतळ यांच्या चमूने ८ ऑक्टोबरला अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून २ लाख ७३ हजार किमतीचा तब्बल ३९ किलो गांजा जप्त केला होता. मात्र, तो गांजा कोणी मागविला हे मात्र अजूनही गुलदस्त्यात होते.

हेही वाचा: जालना : बारावी बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरण्याची लगबग

गांजा मागविणाऱ्यास पाच वर्षे होती शिक्षा

गांजा मागविणारा पोलिसांना चकवा देत होता. मोबाईल लोकेशनसह तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी गांजा मागविणाऱ्या तुपेला अखेर त्याच्या गावातूनच बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे याच तुपेविरोधात शिरूर कासार (जि. बीड) येथील एनडीपीएसच्या गुन्ह्यात पाच वर्षे शिक्षा झाली होती. पाच वर्षे जेलमध्ये काढल्यानंतर सहा महिने होत नाहीत तोच त्याने पुन्हा गांजाचा कारनामा केला होता. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, तुपे याला न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही कामगिरी निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सूर्यतळ यांच्यासह योगेश गुप्ता, संदीपान धर्मे यांनी केली.

loading image
go to top