
औरंगाबाद : शहर विकासाचा बॅकलॉग दोन वर्षांत भरू
वाळूजमहानगर : आगामी दोन वर्षांमध्ये शहराच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार तसेच औरंगाबाद शहराला औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मराठवाडा ऑटो क्लस्टर, वाळूज येथे रविवारी परमनंट प्रॉडक्ट डिस्प्ले सेंटर (पीपीडीसी) च्या उद्घाटनप्रसंगी केले.
मराठवाडा ऑटो क्लस्टरच्यावतीने उभारण्यात आलेल्या भारतातील पहिल्या कायमस्वरूपी अभिनव प्रकल्पांतर्गत सुमारे बावीस विविध उद्योगसमूहांनी स्टॉल उभारले असून त्यामार्फत आपल्या उत्पादन क्षमतांचे तसेच उत्पादनाचे सादरीकरण केले. आयओटीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे प्रदर्शन असून देशात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत मराठवाड्याच्या औद्योगिक क्षमतांचे प्रदर्शन एकाच छताखाली भरवण्याचे योजिले आहे.
डॉ. भागवत कराड यांनी याप्रसंगी औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी काम करणार असून देशातील मोठ्या उद्योगसमूहांचे उद्योग या क्षेत्रात उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले. यासंदर्भात देशातील प्रतिष्ठित उद्योगसमूह टाटा यांच्याशी बोलणी सुरू असून लवकरच त्यांचे शिष्टमंडळ औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी शहरात येणार तसेच या क्षेत्राच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असेही ते म्हणाले.
कार्यक्रमांतर्गत मराठवाडा ऑटो क्लस्टर आणि आयनॉक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रातील अग्रणी उद्योग समूहामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. कोविड काळामध्ये देशभरात ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘आयनॉक्सचे’ मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक आचार्य यांचा सत्कार करण्यात आला. मराठवाडा ऑटो क्लस्टरचे संचालक उमेश दाशरथी यांनी मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या वाटचालीचा आढावा घेतला. अध्यक्ष मुनिष शर्मा यांनी पीपीडीसी प्रकल्प उभारणीमागील भूमिका विशद केली. सूत्रसंचालन उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी तर आभार संचालक आशिष गर्दे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मराठवाडा ऑटो क्लस्टरचे कार्यकारी संचालक जयंत पाडळकर, उपमहाव्यवस्थापक राजेंद्र मुदखेडकर, अनिल देशमुख, सुदर्शन धारूरकर, कृष्णा दहिफळे आदींनी परिश्रम घेतले.
Web Title: Marathwada Auto Cluster Permanent Product Display Center Inauguration Dr Bhagwat Karad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..