esakal | समदं पीक पाण्यानं गेलं.. आता खायचं काय...?
sakal

बोलून बातमी शोधा

समदं पीक पाण्यानं गेलं.. आता खायचं काय...?

समदं पीक पाण्यानं गेलं.. आता खायचं काय...?

sakal_logo
By
नवनाथ इधाटे पाटील

फुलंब्री : यंदा चांगला पाऊस झाल्याने पिकं चांगलीच बहरली व्हती. त्यामुळे यंदा चांगले पीक येईण असा इश्वास व्हता. मात्र, अतिवृष्टीमुळे सप्नांची राखरांगोळी झाली भाऊ. पुराच्या पाण्यात मही आर्धी शेती वाहून गेली. उरलीसुरलं पीकही फुटभर पाण्यात असून आता फुटकी कवडीबी हातात यणार नसल्यानं आता खायचं काय अन् जगायचं कसं असा सवाल शेवता (ता.फुलंबी) येथील बळिराजाने उपस्थित केला.

तालुक्यातील शेवता येथे सकाळ प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली असता उद्ध्वस्त झालेल्या शेतीचे विदारक चित्र दिसून आले. येथील काही शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेल्याचे निदर्शनास आले तर उरलेल्या पिकांत फूटभर पाणी असल्याने ही पिकेही हातातून गेल्याने बळिराजा कोलमडल्याचे चित्र होते. रोजचा खर्च, दवापाणी, पोरांचे शिक्षण, मुलां- मुलींचे लग्नकार्य कसे करायचे असा टाहो येथील शेतकऱ्यांनी फोडली.

पावसाच्या तडाख्यात शेवता येथील शेतकरी यशवंता बेडके यांची २० गुंठे जमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली असून उर्वरित पिकांचीही पाण्याने नासाडी केली आहे. डोळ्यांत डबडबल्या पाण्याने हा शेतकरी म्हणाला. समदं..पीक पुराच्या पाण्यानं.. वाहून नेलं.... मपली इस गुंठे वावरबी वाहून गेलं.....राजकारणातले लोक आले अन् फकस्त पाहून चालल्या गेले. आम्हाला काही मदत पण केली नाही, फकस्त आम्ही सरकारला सांगून तुम्हाला मदत करायला सांगू असेच बोलले. आता आम्ही खायचं काय..? समदं घर वर्षभर कस चालवायचं..? यांचीच मोठी चिंता लागलीया...मायबाप सरकारने लवकर मदत करायला पाहिजी. नसता पुढचे दिस कसे काढायचे याची चिंता लागल्याचे हा बळिराजा म्हणाला.

शेवता परिसरात इतरही शेतकऱ्यांच्या जमीन पुराच्या पाण्याने होत्याच्या नव्हत्या केल्या असून नदीकाठी गट नंबर १९ मधील यशवंता बेडके यांच्यासह जमिनीसह पंढरीनाथ बेडके यांच्या मालकीच्या गट नंबर २४६ मधील दहा गुंठे जमिनीचे अस्तित्वच मिटले असून साईनाथ बेडके यांच्या गट नंबर ४२३ मधील एक एकर क्षेत्रातील कपाशीच्या पिकांत सुमारे दोन फूट पुराचे पाणी तुंबलेले असल्याने कपाशीच्या कैऱ्या काळ्या पडून सडल्याने पिकावर केलेला खर्चही निघणार नसल्याने नुकसानीचे दुःख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाल्याने आता मायबाप सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा असून योग्य मदत मिळाल्यास जगाचा पोशिंदा तग धरेल. नसता योग्य मदत न मिळाल्यास शेतकरीराजा आणखी कोलमडल्याशिवाय राहणार हे नक्की.

राजकीय पुढारी आले अन् फोटो काढून गेले

अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने प्रत्येक पक्षांचे पुढारी आले. अन् आमच्यासोबत फोटू काढून गेले. प्रत्येक्षात ठोस मदत एकाही पुढाऱ्याने केली नसल्याने येथील बळिराजा सांगत होता.

दळणासाठी संघर्ष

शेवता बुद्रुक व शेवता खुर्द या दोन्ही गावाच्या मध्ये नदी आडवी आहे. या नदीवर पूल नसल्याने शेवता बुद्रुक मधील विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. दुसरीकडे शेवता बुद्रुक मध्ये गिरणी नसल्याने दळण दळून आणण्यासाठी येथील नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

loading image
go to top