
शिवसेना ‘राष्ट्रवादी’च्या दावणीला बांधली; तानाजी सावंत
लातूर : विधानसभेच्या गत निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून आम्ही सर्वांनी मते मागितली. जनतेने २०१९ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेला कौल दिला. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे काम केले, अशी टीका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी येथे केली.
येथे रविवारी (ता. २५) झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. संपर्क प्रमुख बालाजी काकडे, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा प्रमुख ॲड. बळवंत जाधव, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने उपस्थितीत होते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आमदाराच्या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ला बळ देण्याचे काम सुरू होते. शिवसेनेच्या काही आमदारांना ‘राष्ट्रवादी’त येण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू होता. ‘राष्ट्रवादी’कडे अर्थ खाते असल्याने शिवसेना आमदारांचीच नव्हे तर शिवसेनेच्या मंत्र्यांचीही कुचंबणा होत होती. त्यामुळेच शिवसेनेच्या ४० आमदारांनी उठाव केला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले. ही शिवसेनेशी गद्दारी नसून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. मूळ शिवसेना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले जाईल असे सावंत म्हणाले.