वीस वर्षांनी कूस उजवली, पण चार दिवसांतच चिरमुडी आईला पोरकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दत्तक मुलगी मोनिका व नवजात मुलगी तर दुसऱ्या छायाचित्रात आशा जेट्टे

मात्र एके दिवशी आशाच्या पोटात अचानक दुखायला लागले म्हणून सोलापूर येथील खासगी दवाखान्यात त्यांना दाखविले असता परिस्थिती नाजूक असल्याने बाळाला शस्त्रक्रिया करून काढणे गरजेच असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वीस वर्षांनी कूस उजवली, पण चार दिवसांतच चिरमुडी आईला पोरकी

औसा (जि.लातूर) : लग्नानंतर वीस वर्षे मूल व्हावे, यासाठी भरपूर संघर्ष केला. विविध चाचण्या व उपचार करूनही मूल होण्याची चिन्हे दिसेनात म्हणून भावाची मुलगी दत्तक घेतली व तिला पोटच्या मुलाप्रमाणे वाढविली. तिचे शिक्षण केले अन् शेवटी परमेश्वर कृपाळू झाला. पत्नीला दिवस गेले. सगळीकडे आनंदी आनंद होता. आठवा महिना सुरू असताना अचानक पोटात दुखू लागल्याने पत्नीला सोलापूर (Solapur) येथील दवाखान्यात दाखविले असताना मोठी गुंतागुंतीची अडचण आली आणि आठव्या महिन्यातच शस्त्रक्रिया करून बाळ काढावे लागले. मुलगी झाली... बाळ अडीच किलोचे असल्याने ते जगेल याची खात्री डॉक्टरांनी दिल्यावर आईला कोरोनाने गाठले आणि चारच दिवसात ती चिमुकली आईला पोरकी झाली. उपचार सुरू असताना आईने अखेरचा श्वास घेतला. आईची कूस उजवली. मात्र बाळाला वाढविण्याचे स्वप्न तिला सत्यात उतरवता आले नाही. ही हृदयद्रावक कहाणी आहे मूळचे उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील लोहारा गावाचे पण हल्ली मुक्कामी गुळखेडा (ता.औसा) (Ausa) येथे राहणारे माजी सैनिक महेश जेट्टे यांची. (Mother Died Left Behind New Born Daughter In Ausa)

हेही वाचा: वैद्यकीय शिक्षणमंत्री महोदय, डाॅक्टर कोरोनाशी झुंज देतोय, करणार का मदत?

महेश जेट्टे हे भारतीय सैन्यदलात २३ वर्षांपासून देशातल्या विविध ठिकाणी आपली सेवा बजावत होते. ते जरी सैन्यात असले तरी त्यांना शेतीची खूप आवड होती. शेतीसाठी त्यांना साथ देत होती. ती त्यांची पत्नी आशा जेट्टे. महिला असूनही त्यांनी शेतीत अनेक प्रयोग करीत भरपूर उत्पादन घेतले होते. सर्वकाही भरपूर होते. फक्त मूल नव्हते. हीच त्यांच्या जीवनात कमी होती. मुलासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. उपचार केले मात्र यश येत नसल्याने त्यांनी आपल्या भावाची मुलगी मोनिका हिला दत्तक घेतले. तिलाच आपली मुलगी मानून आई बापाची माया लावली. मोनिकाला सीए व्हायचे होते म्हणून तिला लातूरला शाहू महाविद्यालयात घातले. दीड वर्षांपूर्वी महेश जेट्टे हे सेवानिवृत्त झाले आणि त्यांचे नशीब फळफळले. आशाला यांना दिवस गेले. त्याच आनंदात जेट्टे कुटुंब होते. हा हा म्हणता आठ महिने सरले.

मात्र एके दिवशी आशाच्या पोटात अचानक दुखायला लागले म्हणून सोलापूर येथील खासगी दवाखान्यात त्यांना दाखविले असता परिस्थिती नाजूक असल्याने बाळाला शस्त्रक्रिया करून काढणे गरजेच असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रिया झाली आणि अडीच किलो वजनाची सुंदर मुलगी जन्माला आली. त्यातच आशाबाईंना कोरोनाची लागण झाली. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. अजून बाळाला डोळे भरून पाहिलेही नाही, तोवरच नियतीने मायलेकीची ताटातूट केली. मुलीचा ऑक्सिजन कमी (Oxygent Shortage) असल्याने तिच्यावर वेगळ्या ठिकाणी उपचार सुरू होते. बाळ आईजवळ फक्त काहीवेळच राहिले. शेवटी कोरोनाने आपला पाश अवळलाच आणि आशाबाई आपल्या चार दिवसांच्या बाळासह दत्तक घेतलेली मोनिका आणि पती महेश यांना सोडून गेल्या. नियतीने त्यांची कूस तर उजवली. पण बाळाचे सुख हिरावून घेतले. आता त्या बाळाची देखभाल मोनिकाची जन्मदाती आई म्हणजेच महेशच्या वहिनी करीत आहेत. काय म्हणावे जिची मुलगी आशाबाई आणि महेश यांनी वाढविली. आता त्याच महिलेवर आशा आणि महेश यांची मुलगी वाढविण्याची वेळ आली. मुलीला जन्म देताच चारच दिवसांत तिची आई तिला सोडून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नियतीने धडधाकट आईला हिरावले आणि चार दिवसांच्या बाळाला सुखरूप ठेवत आहे.

loading image
go to top