औरंगाबाद : नाकर्तेपणा मनपाचा; मनस्ताप महावितरणला

शहागंज भागात पंधरा ते वीस तास लाईट गूल; केबल खोदताना उच्च दाबाची केबल तोडली
MSEDCL breaks underground cable
MSEDCL breaks underground cableSakal

औरंगाबाद - महापालिकेने पानदरीबा, खाराकुआं भागात ड्रेनेजलाईनसाठी खोदकाम केले.. मात्र, हे काम करताना, निष्काळजीपणामुळे जेसीबीने महावितरणची उच्च दाब वाहिनीची अंडरग्राऊंड केबल तोडली. ही बाब महावितरणला सांगितलीच नाही. त्यामुळे परिसरातील दोन डीपीवरील हजारावर नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. हा फॉल्ट शोधताना महावितरणची अक्षरशः दमछाक झाली. शनिवारी (ता. सात) खंडित झालेला विद्युत पुरवठा रविवारी (ता.८) दुपारी सुरळीत झाला. यानंतर नागरिकांनी सुटकेचा निः श्वास सोडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरणतर्फे शनिवारी खाराकुंआ भागात ड्रेनेजच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले. मात्र, काम करताना कुठलीही काळजी घेतली नाही, उलट निष्काळजीपणे काम केल्याने जेसीबीच्या सहाय्याने महावितरणची या भागातून जाणारी ११ केव्ही क्षमतेची अंडरग्राऊंड केबल तुटली. त्यामुळे शहागंज उपकेंद्राच्या अंतर्गत शनिवारी दुपारपासून धावणी मोहल्ला, पानदरीबा, किराणाचावडी, खाराकुंआ आणि परीसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. तब्बल दोन ते तीन हजार नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. विशेष म्हणजे मनपाने काम करताना केबल तुटली याची साधी माहितीही महावितरणला दिली नाही.

दुसरीकडे विद्युत पुरवठा नसल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांची दुपारी दीड वाजेपासून फॉल्ट शोधण्यासाठी शोध मोहीम सुरु झाली. टेस्टींग व्हॅनच्या साहाय्याने तब्बल एक ते दीड किलोमीटरच्या केबलमधील बिघाड शोधण्याचे काम शनिवारी रात्री तब्बल दीड वाजेपर्यंत सुरु होते. रात्री एक वाजता केबल तुटल्याचे लक्षात आल्यानंतर महावितरणच्या पथकाने दोन फेजच्या मधून तिसरा फेज जोडून तात्पुरता विद्युत पुरवठा सुरु केला. त्यामुळे रात्री अडीच वाजेनंतर या भागात काही प्रमाणात विद्युत पुरवठा सुरु झाला. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. तुटलेल्या केबलला जॉइंट करण्यात आले, मात्र, ही केबल पुन्हा नादुरुस्त झाली, त्यानंतर महावितरणने वाळूज येथून केबल मागवली, त्यानंतर पुन्हा केबलचा काही भाग बदलून जॉइंटर व्हॅनच्या मदतीने जॉइंट केल्यानंतर रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरु झाला. यानंतर वीज पुरवठा सुरु झाल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि ःश्वास सोडला.

मनपाकडून खोदकाम करताना नेहमीच केबलचे नुकसान होते. पानदरीबा येथे केबल तुटल्यानंतर किमान महावितरणला कळवले असते तर वेळीच दुरुस्ती झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले नसते. काम करण्यापूर्वीच समन्वय साधला तर नुकसान आणि मनस्तापही होणार नाही.

- अल्ताफ शेख, सहाय्यक अभियंता, शहागंज उपविभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com