मुंबईचा झेंडा फडकत राहो ...

मुंबईचा झेंडा फडकत राहो ...
Published on: 
.... (((( न्यायव्यवस्थेचा जन्म )))) भाग ४ --- मुंबईचा झेंडा फडकत राहो... .... भारताचे स्वतंत्र भारतातील पहिले ॲटर्नी जनरल मोतीलाल सेटलवाड यांनी १९७४ मध्ये ज्येष्ठ वकील फली नरिमन यांना एक सल्ला दिला होता, ‘कीप द बॉंबे फ्लॅग फ्लाइंग अर्थात मुंबईचा झेंडा फडकत राहो.’’ हे केवळ एका शहराच्या अभिमानाचे वाक्य नाही. हे मुंबईच्या न्यायपरंपरेचे प्रतीक बनले. मुंबई उच्च न्यायालयाची परंपरा, तेथील बारची गुणवत्ता, कायद्याचा सखोल अभ्यास, घटनात्मक प्रश्नांवरील पकड आणि न्यायालयीन स्वातंत्र्याबद्दलची बांधिलकी या सगळ्यांचा त्या वाक्यात एक प्रकारे सारांश आहे.आणि ही परंपरा एका पिढीपुरती थांबलेली नाही. ती पुढच्या पिढीकडे गेली, एका वकिलाकडून दुसऱ्या वकिलाकडे, एका न्यायमूर्तीकडून पुढच्या न्यायमूर्तीकडे, एका पिढीच्या न्यायशास्त्रातून पुढच्या पिढीच्या विचारविश्वात. फेडरल कोर्टाचा वारसा आजही जिवंत १९३७ मध्ये ब्रिटिश भारतासाठी स्थापन झालेले फेडरल कोर्ट आणि १९५० मध्ये जन्माला आलेले भारतीय सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये केवळ तेरा वर्षांचे अंतर आहे. पण, या तेरा वर्षांत भारताने राजकीयदृष्ट्या आणि घटनात्मकदृष्ट्या शतकांइतका मोठा प्रवास केला. ब्रिटिश सत्तेच्या काळातील न्यायव्यवस्थेपासून स्वतंत्र भारताच्या संविधानिक न्यायव्यवस्थेपर्यंतचा हा प्रवास होता. एकेकाळी अंतिम न्यायासाठी इंग्लंडला जावे लागत होते. आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय जगभरातील घटनात्मक न्यायशास्त्राच्या चर्चेत अभ्यासले जातात. एकेकाळी भारतीय न्यायव्यवस्थेची अंतिम कडी भारताबाहेर होती. आज भारतीय संविधानाचे संरक्षण करणारी सर्वोच्च न्यायिक संस्था भारतातच आहे आणि एका छोट्याशा फेडरल कोर्टापासून सुरू झालेली ही संस्था आज जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च शिखर आहे. न्यायव्यवस्थेची ताकद इमारतीत नसते आज आपण सर्वोच्च न्यायालयाची भव्य इमारत, न्यायमूर्तींची संख्या, मोठमोठी न्यायपीठे आणि हजारो प्रलंबित प्रकरणे याबद्दल बोलतो. पण न्यायव्यवस्थेची खरी ताकद या गोष्टींमध्ये नसते. ती असते न्यायमूर्तींच्या स्वातंत्र्यात, वकिलांच्या गुणवत्तेत, कायद्याच्या सखोल अभ्यासात, संविधानावरील निष्ठेत आणि सामान्य नागरिकाला न्याय मिळेल या विश्वासात. १९३७ मध्ये फेडरल कोर्ट सुरू झाले तेव्हा कदाचित कोणालाही कल्पना नसेल की पुढील काही दशकांत ही संस्था भारतीय लोकशाहीच्या सर्वांत महत्त्वाच्या आधारस्तंभांपैकी एक बनेल आणि मुंबईच्या न्यायपरंपरेलाही या प्रवासात आपले स्वतंत्र स्थान मिळेल .आजही सर्वोच्च न्यायालयात मुंबईचा आवाज ऐकू येतो. म्हणूनच मोतीलाल सेटलवाड यांनी फली नरिमन यांना दिलेला तो जुना सल्ला आजही तितकाच अर्थपूर्ण वाटतो ‘कीप द बाँबे फ्लॅग फ्लाइंग.’ कारण हा झेंडा केवळ मुंबईचा नाही. तो ‘कायद्याच्या राज्याचा, न्यायाच्या परंपरेचा आणि स्वतंत्र न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा झेंडा आहे’ आणि तो पुढच्या पिढ्यांनीही तितक्याच अभिमानाने उंच ठेवला पाहिजे. - ॲड. शैलेश चपळगावकर ९८२२३१७०९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com