esakal | 'महापालिका शाळेतील विद्यार्थांची संख्या वाढवा अन्यथा कारवाई'
sakal

बोलून बातमी शोधा

schools

'महापालिका शाळेतील विद्यार्थांची संख्या वाढवा अन्यथा कारवाई'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: महापालिका शाळेतील विद्यार्थांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. विद्यार्थी संख्या का कमी होत आहे? आपण कुठेतरी कमी पडतो का? याचा विचार करा. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही तर प्रत्येक शाळेतील वरिष्ठ शिक्षकांपासून कारवाईला सुरवात होईल, असा इशारा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिला. महापालिकेच्या शहरात मराठी, उर्दू माध्यमाच्या ७३ शाळा आहेत. कधी काळी या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५ ते ३० हजारांच्या घरात होती. मात्र खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिका शाळा कमी पडत असल्याने विद्यार्थी संख्या १० ते १२ हजारांवर आली आहे.

शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात. बहुतांश महापालिका शाळांच्या मोठ्या इमारती आहेत. खेळाची मैदाने आहेत. विद्यार्थ्यांनी महापालिका शाळेत यावे यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. पण विद्यार्थी संख्या वाढण्या ऐवजी कमी होत आहे. यापार्श्‍वभूमीवर महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे, अशा सूचना शिक्षकांना करण्यात आल्या. महापालिका शाळेपासून विद्यार्थी दूर जात आहेत. याचा अर्थ आपण चांगले शिक्षण देण्यात कमी पडत आहोत, असाही होतो. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढली नाही तर प्रत्येक शाळेतील वरिष्ठ शिक्षकांपासून कारवाईला सुरुवात होईल, अशी तंबी श्री. पांडेय यांनी बैठकीत दिल्याचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा: Covid-19: मुंबईत गेल्या 24 तासांत 500 पेक्षाही कमी नवे रूग्ण

आधी नोटीस, नंतर सक्तीची रजा-
विद्यार्थी संख्या न वाढविणाऱ्या शाळेतील वरिष्ठांना आधी नोटीस दिली जाईल. त्यानंतरही फरक पडला नाही तर सक्तीच्या रजेवर पाठविले जाईल. त्यानंतर थेट घरी बसविण्याचा पर्याय असेल, अशा भाषेत श्री. पांडेय यांनी शिक्षकांना खडसावले.

loading image