छत्रपती संभाजीनगर - महापालिका निवडणुकीसाठी यंदा तब्बल ८५९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रमुख पक्षांसह अपक्षांची त्यात मोठी संख्या आहेत. ८५९ पैकी फक्त ११५ जण नगरसेवक होणार आहेत..जे निवडून येतील त्यांना महिन्याला १० हजारांचे म्हणजेच पाच वर्षांत केवळ ६ लाख रुपये मानधन मिळणार आहे. प्रत्येक बैठकीचे १०० रुपये मानधन मिळते. असे असताना निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च करून नगरसेवक होण्यासाठी एवढी चुरस का, खरेच यांना नागरिकांचा सेवक व्हायचे का, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे..महापालिकेची यंदाची निवडणूक प्रभाग पद्धतीने होत असून, २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. दहा वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत असल्याने सर्वच पक्षांत यंदा उमेदवारांची गर्दी झाली. सत्ताधारी भाजप, शिवसेना पक्षात प्रवेशासाठी जणू रांगा लागल्याचे चित्र होते.‘कोणत्याही पक्षात जाऊ पण उमेदवार आपणच’ राहू असे सांगत मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी पदरात पाडून घेण्यात आली. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडी झालेली नाही. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्ष, बंडखोर, अपक्ष असे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ११५ जागांसाठी ८५९ जणांमध्ये चुरस आहे..नगरसेवक होण्यासाठी एवढी चुरस का, असा प्रश्न मतदारांमधून उपस्थित केला जात आहे. नगरसेवक झाल्यानंतर एका नगरसेवकाला दरमहा केवळ १० हजार रुपये मानधन आणि प्रत्येक सर्वसाधारण सभेसाठी अवघे १०० रुपये भत्ता मिळतो. आर्थिक गणिताचा विचार केला तर हे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. मात्र, असे असतानाही यंदाच्या निवडणुकीत तब्बल ८५९ उमेदवारांनी शड्डू ठोकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे..कोट्यवधींचा खर्चनिवडणूक आयोगाने एका उमेदवारासाठी ११ लाख रुपये एवढी खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. पण, प्रत्यक्षात निवडणुकीचा खर्च एक ते दीड कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ज्याठिकाणी जास्त चुरस आहे, तिथे पाण्यासारखा पैसा खर्च होईल, असेही बोलले जात आहेत. एवढा खर्च करून आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेत जाऊन नगरसेवक काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..महापौर, पदाधिकाऱ्यांना मिळते काय?महापौरांना देखील नगरसेवकाएवढेच मानधन मिळते. त्यासोबत पेट्रोल भत्ता, राहण्यासाठी निवासस्थान, चहा पाण्याचा खर्च यासह इतर सुविधा मिळतात. स्थायी समिती सभापतीपद हे क्रिम पद म्हणून ओळखले जाते. स्थायी समितीतून अर्थकारण चालते. त्यामुळे स्थायी समितीवर जाण्यासाठी मोठी चूरस असते. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडणूक आमदारकीची लढविणाऱ्या उमदेवारांकडून नगरसेवकांना ‘विशेष’ महत्व दिले जाते..‘कंत्राटा’तून जातो `विकासाचा मार्ग`नगरसेवक ही राजकारणातील पहिली पायरी मानली जाते. महापालिकेच्या राजकारणातून अनेकजण आमदार, खासदार झाले. अनेकांची मंत्रिपदावर वर्णी लागली. त्यामुळे एकीकडे नगरसेवकाला वलय असले तरी बोटावर मोजण्या एवढ्याच जणांना नगरसेवकापासून पुढची वाटचाल करता आलेली आहे..अनेक जण महापालिकेच्या राजकारणात एवढी गुरफटून गेले आहेत की, वर्षानुवर्षे तेच ते चेहरे महापालिकेत असतात. यातील अनेकांनी ‘कंत्राटा’च्या माध्यमातून ‘विकासा’चा मार्ग शोधला आहे. महापालिकेतील अधिकारी लॉबीला हाताशी धरून अनेक जण नागरिकांची सेवा करता करता कोट्यधीश झालेले आहेत. त्यामुळे नगरसेवकाची एक टर्म जरी मिळाली तरी दोन-तीन पिढ्यांची कमाई होते, अशी चर्चा महापालिका वर्तुळात होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.