औरंगाबाद : नशेच्या धुंदीत केला मित्राचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

औरंगाबाद : नशेच्या धुंदीत केला मित्राचा खून

औरंगाबाद - शहरात नशेखोरीचे प्रमाण वाढतच असून याच प्रकारातून ‘बटन’ गोळ्या खाऊन बेधुंद झालेल्या रेकॉर्डवरील एका आरोपीने त्याच्या साथीदाराचा चाकूने भोसकून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी (ता.८) मध्यरात्री जिन्सीतील बायजीपुऱ्यातील सिकंदर हॉलजवळ भर रस्त्यावर मध्यरात्री १२ वाजेदरम्यान घडली. विशेष म्हणजे, आरोपी खून करुन रक्ताने माखलेल्या कपड्यांसह जिन्सी ठाण्यात गेला होता. मृतही रेकॉर्डवरील आरोपी आहे. हैदर ऊर्फ शारेख जफर खान (वय २२, रा. गल्ली नं. सी-११, संजयनगर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी जानेवारीमध्ये जाहीर केलेल्या गुन्हेगारीसंदर्भात वार्षिक अहवालात नशेखोरांचे प्रमाण वाढल्याची चिंता व्यक्त केली होती.

शाहरुख अन्वर शेख (वय-साडेसतरा वर्षे, रा. गल्ली नं. ३०, बायजीपूरा) असे मृताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख हा त्याच्या आजीकडे (आईची आई) राहायचा. त्याच्या बहिणीचे लग्न झालेले असून, वडिलांचे पंधरा वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्याच्या आईने दुसरा विवाह केलेला आहे. मृत शाहरुख आणि आरोपी हैदर हे दोघे एकाच भागातील रहिवासी असल्याने आधीपासून ओळखीचे होते. रविवारी रात्री शाहरुख आणि हैदर सिकंदर हॉलसमोर एकत्र आले. हैदरकडे कमरेला चाकू लावलेला होता. बोलता-बोलता त्यांच्यात भांडण सुरू झाले. शाहरुख हा शरीराने लहान, तर हैदरची शरीरयष्टी बलदंड आहे. हैदरने शाहरुखला बेदम मारहाण करीत त्याच्यावर चाकूहल्ला चढविला. त्याच्या छातीत, बरगडीत, पाठीत आणि मांड्यांवर सहा ते सात वार केले. प्रचंड रक्तस्राव झाल्याने शाहरुख जागेवरच कोसळला. यादरम्यान, हैदरलाही एक ठिकाणी चाकू लागला. तोही जखमी झाला होता.

रक्ताने माखलेल्या अवस्थेत गेला ठाण्यात

शाहरुखला गंभीर जखमी अवस्थेत सोडून हैदर रक्ताने माखलेल्या कपड्यांसह जिन्सी ठाण्यात गेला. हैदर खान हा जखमी अवस्थेत ठाण्यात आल्यामुळे पोलिसांनी आधी त्याला मेडिकल मेमो देऊन उपचारासाठी घाटीत पाठविले. त्यानंतर काही वेळातच सिकंदर हॉलसमोर शाहरूख शेख हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली. जिन्सी ठाण्यातील उपनिरीक्षक अनंता तांगडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शाहरूखला रिक्षाने घाटीत नेले. तेथे उपचार सुरू असताना शाहरूखची प्राणज्योत मालवली.

मृतही होता रेकॉर्डवरील आरोपी

मृत शाहरूख शेखविरुद्ध जिन्सी ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार एक, चोरीचे तीन, घरफोडीचा एक, मारहाण व शिवीगाळ केल्याचा एक असे सहा गुन्हे दाखल आहेत. तर, आरोपी हैदरविरुद्ध २०१९ मध्ये मुंबई जुगार कायद्यानुसार एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली. केंद्रे यांनी शाहरूखला गुन्हेगारीपासून दूर ठेवा, असे त्याच्या आजीला अनेकदा सांगितले, पण त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर, नशेखोरी आणि गुन्हेगारीतचा त्याचा काटा काढण्यात आला. या प्रकरणी शाहरूखचा मामा जावेद खालेद पठाण (३२, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) यांच्या फिर्यादीवरून हैदर खानविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हैदरवर घाटीत उपचार सुरू आहेत.

Web Title: Murder Of Friend Intoxicated At Bayjipurya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top