
लोखंडी पाईपने तरुणाचा खून; प्रेत फेकले शेतात
कन्नड - कुंजखेडा (ता. कन्नड) येथे सख्या साडूभावाला जेवणाचे आमंत्रण देऊन लोखंडी पाईपने खून केल्याची घटना कन्नड तालुक्यातील कुंजखेडा येथे रविवारी (ता.१७) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाजखाँ हारून खाँ पठाण (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महेफूज खाँ महेबूब खाँ पठाण (वय-३० रा.कुंजखेडा-दाभाडी) यास ताब्यात घेतले. याबाबत कन्नड पोलिस ठाण्यात हारुनखाँ उस्मानखॉं पठाण (वय-५२ रा.कुंजखेडा) यांनी फिर्याद दिली की, आरोपी महेफूज खाँ महेबूब खाँ पठाण याने एजाजखाँ हारून खाँ पठाण याला स्वतःच्या (ता.१७) मळ्यातील घरी जेवणाचे निमंत्रण दिले. जेवण झाल्यानंतर रात्री आरोपीने एजाजखाँ पठाणच्या डोक्यात लोखंडी पाइप मारून त्याचा काटा काढला. तसेच पार्थिव अख्तर अब्दुल पठाण यांच्या मक्याच्या शेतात फेकून दिले.
दरम्यान, सोमवारी (ता.१८) सकाळी आठ वाजता ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यास कळविले. यानंतर पोलिस निरीक्षक टी. आर. भालेराव,पोहेकॉ. सतीश खोसरे, संजय अटोळे, कैलास करवंदे, एस. डी. शिंदे, बी. एम. राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिस निरीक्षक भालेराव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, पोलिस अधीक्षक निमित गोयल यांना माहिती दिली. येथे श्वान पथकाला पाचारण करून आरोपीचा मागोवा घेतला असता श्वान शेतात फिरून आरोपी महेफूज पठाण याच्या घरात घुटमळले. नंतर छतावर गेले. यावरून आरोपी घरातीलच असल्याचा संशय पोलिसांना आला होता. दरम्यान, मृतावर कन्नड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करू नये, यासाठी मृताच्या नातेवाइकांनी दबाव आणला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. यामुळे औरंगाबाद येथून दंगाकाबू पथक पाचारण करण्यात आले. कन्नड पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस उप निरीक्षक एस. एस. राजपूत अधिक तपास करत आहेत.
पोलिसी खाक्या दाखविताच कबुली
दरम्यान, पोलिसांना मृत एजाजखाँ पठाणच्या प्रेतापासून शंभर फूट अंतरावर लोखंडी पाइप आढळून आला. पोलिसांनी तो हस्तगत केला. यानंतर साडे दहा वाजेच्या सुमारास आरोपी महेफूजला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खून केल्याची कबुली दिली. मात्र, हत्येचे कारण सांगितले नाही.
Web Title: Murder Of Young With Iron Pipe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..