निवडणुकीमुळे शुक्रवारचा
आठवडे बाजार राहणार बंद
----
नांदेड, ता. १९ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २३ ऑक्टोबर) नांदेड जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या परिसरात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. हे बाजार शनिवार (ता. २४ ऑक्टोबर) रोजी भरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधील शहरी व ग्रामीण भागांत एकूण १२० मतदान केंद्रांवर २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडावी, तसेच मतदान केंद्रांच्या परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक, पुणे यांच्या निर्देशानुसार संबंधित मतदान केंद्रांच्या परिसरातील आठवडे बाजार मतदानाच्या दिवशी बंद राहतील. मात्र, हे बाजार अन्य दिवशी भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार २३ ऑक्टोबर रोजी भरणारे संबंधित आठवडे बाजार २४ ऑक्टोबर रोजी भरविण्यात येणार आहेत. मार्केट अँड फेअर ॲक्ट, १८६२ मधील कलम ५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हे आदेश जारी केले आहेत. संबंधित बाजार आयोजक आणि व्यापाऱ्यांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.