ऑक्टोबर हीट; नांदेड @ ३६
------
आगामी काळात तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
-------
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. ७ : सप्टेंबरअखेरपर्यंत ढगाळ वातावरणाचा अनुभव घेतलेल्या नांदेडकरांना ऑक्टोबरच्या सुरवातीलाच उन्हाच्या तडाख्याला सामोरे जावे लागत आहे. कमाल तापमानाने पुन्हा ३६ अंशांचा टप्पा गाठला असून, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत कमाल तापमान ३७ ते ३८ अंशांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरवातीलाच नांदेडकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. सप्टेंबरअखेरीस कमाल तापमानात झालेली घट फार काळ टिकली नाही. ३० सप्टेंबरला नांदेडचे कमाल तापमान ३२ अंशांवर होते. त्यानंतर काही दिवसांतच तापमान वाढत जाऊन ३६ अंशांवर पोचले. अवघ्या काही दिवसांत चार अंशांच्या वाढीमुळे वातावरणात पुन्हा उष्णता जाणवत असून, दोन दिवसांपासून नागरिकांना वातावरणात दिवसा चटका, तर रात्री उकाडा जाणवत आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी शक्यतो उन्हात जाणे टाळावे, तसेच पुरेसे पाणी प्यावे, अशी गरज निर्माण झाली आहे.
---
आभाळ भरून येते, पण...
बुधवारी दुपारनंतर नांदेड शहरात अचानक पावसाळी वातावरण तयार झाले. आकाशात ढग दाटून आल्याने काही वेळात पाऊस सुरू होईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, ढगाळ वातावरण कायम राहूनही पाऊस झाला नाही. त्यानंतर पुन्हा उन्हाची तीव्रता जाणवू लागली. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात तापमान ३५ अंशांच्या पुढे गेल्याने दुपारच्या वेळी रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक महिला व तरुणी डोक्यावर स्कार्फ बांधून उन्हापासून बचाव करताना दिसत आहेत.
---