Latur News : जिल्ह्यातील शेती उत्पादनांना राष्ट्रीय ओळख

बोरसुरी डाळ, कास्ती कोथिंबीर, पटडी चिंचेला ‘जीआय’ मानांकन, नावीन्यपूर्ण उपक्रमाचे यश
latur
latursakal
Updated on

लातूर : बोरसुरी (ता. निलंगा) येथील तूरडाळ, पानचिंचोली (ता. निलंगा) येथील पटडी चिंच आणि आशिव (ता. औसा) येथील कास्ती कोथिंबिरीला अखेर भौगोलिक मानांकन ‘जीआय’ टॅग मिळाले आहे. या तीनही उत्पादनाचे वेगळेपण सिद्ध करण्यात कृषी व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ला यश आले. आत्माने जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून दोन वर्षांत केलेल्या प्रयत्नामुळे तीनही उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहे.

केंद्र सरकारच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या एकस्व अभिकल्प एवं व्यापार चिन्ह औद्योगिक नीती एवं संवर्धन विभागाच्या महानियंत्रकांनी ता.२९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रिकेत या तीन उत्पादनांचा समावेश आहे.अनेक पिके, फळे, भाजीपाला आदी उत्पादने त्या त्या भौगोलिक ठिकाणाशी निगडित असतात किंवा पारंपरिक पद्धतीने तयार केलेले असतात.

latur
Latur News : बुद्धिबळ स्पर्धेत ओंकार पाटील विजेता

त्यांचा दर्जा वेगळा असतो. अशा उत्पादनांसाठी भौगोलिक मानांकन घेतल्यास त्या नावाचा किंवा उत्पादनाचा गैरवापर कोणी करू शकत नाहीत. ते उत्पादन त्या ठिकाणाच्या नावानेच ओळखले जाऊ शकते. बौद्धिक संपदा कायद्यानुसार असे भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी वर्ल्ड ट्रेड युनियन व अन्य यंत्रणांकडे नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी प्राचीन व आवश्यक पुरावे द्यावे लागतात. त्यानंतर छाननी होऊन नोंदणी होते व उत्पादनाला कायदेशीर संरक्षण मिळते.

त्याचा अनधिकृत वापर कोणी करू शकत नाही, तसे केल्यास मानांकन घेतलेली व्यक्ती व संस्था संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून आपले हक्क मिळवू शकते. यातूनच ग्राहकांना दर्जेदार उत्पादन मिळते आणि उत्पादकांनाही फायदा होतो. उत्पादनाला चांगली किंमत मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळते. या धर्तीवर बोरसुरी तूरडाळीसह पानचिंचोली चिंच व कास्ती कोथिंबिरीच्या मानांकनासाठी कृषी विभागाने वर्ष २०२१ मध्ये प्रयत्न सुरू केले होते. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून यासाठी आत्माला ४५ लाखाचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता.

latur
Latur News : लुटमारीच्या तयारीतील चौघे गजाआड

मानांकनासाठी पुराव्यांचा शोध

मानांकनासाठी पन्नास ते साठ वर्षांपूर्वीचे नोंदीचे पुरावे आवश्यक होते. त्यासाठी महाराष्ट्राच्या जुन्या गॅझेटमध्ये बोरसुरी डाळ, निलंगा चिंच व औसा कोथिंबिरीच्या नोंदीचा शोध घेण्यात आला. काही संशोधकांच्या प्रबंधांतील नोंदी, जुन्या वर्तमानपत्रातील बातम्या तसेच ऐतिहासिक पुस्तकातील नोंदी शोधल्या. यात बोरसुरी डाळीसाठी डॉ. व्यंकट कोळपे यांनी बोरसुरी जुन्या गावाची संस्कृती या विषयावर वर्ष २०१६ मध्ये लिहिलेल्या शोधप्रबंधातील नोंदी तर पानचिंचोली गावाच्या नावातून चिंचोली म्हणजे चिंच असल्याचे दाखवून पटडीसाठी भौगोलिक मानांकन मिळवण्यात कृषी विभागाला यश आले आहे.

बोरसुरी, पटडी, कास्तीचे वेगळेपण

बोरसुरी तूर डाळीचे उत्पादन बोरसुरी गावच्या शिवारात घेतले जाते. या डाळीची चव वेगळी व मटणाच्या रश्शासारखी आहे. डाळीपेक्षा या भागातील विहिरीच्या पाण्याचेच महत्त्व अधिक असल्याचे सांगण्यात येते. ही डाळ लवकर शिजते मात्र, लवकर खराब (शिळी) होत नाही. कास्ती कोथिंबिरीचीही चव व सुगंध वेगळा आहे. कोथिंबिरीला देशभर मोठी मागणी आहे. विशेषतः बंगळूरू व कोलकाताच्या बाजारपेठेत अधिक पसंती आहे. निलंगा तालुक्यातील काही गावांत निलंगा चिंचेची जुनी व मोठी झाडे आहेत. चिंच लांब व गोड असून पटडी चिंच म्हणून तिची ओळख आहे. चिंच प्रसिद्ध असून तिला औषधी गुणधर्मही आहेत. चव चांगली व दिसायला आकर्षक आहे.

महाराष्ट्रातील नऊ उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. यातील तीन लातूरचे असल्यामुळे लातूरकरांना विशेष आनंद आहे. या मानांकनामुळे या तीन उत्पादनाला मोठी राष्ट्रीय ओळख निर्माण होईल. उत्पादनाला मोठी चालना मिळेल. राष्ट्रीय बाजारात मागणी वाढेल. त्यासाठी दर्जा राखण्याचे आव्हान असेल. हा दर्जा निश्चित राखला जाईल.

- पी. डी. हणभर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, लातूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com