

छत्रपती संभाजीनगर - नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी (ता. १५) घरोघरी घटस्थापना करण्यात येणार आहे. आपल्या शेतातली काळी माती टाकून तिच्या मधोमध पाण्याने भरलेला मातीचा घट ठेवला जातो. घटाभोवताली सात प्रकारची धान्ये टाकून घरोघरी घटस्थापना केली जाते. रब्बीमध्ये पेरण्यात येणाऱ्या बियाणांची उगवण क्षमता तपासून बघण्याचा ही आपल्या कृषी संस्कृतीमधील एक प्रकारची प्रयोगशाळा. तसेच पाणी जपून वापरण्याचा संदेश देणारा जलपूजक संस्कृतीचा हा नऊ दिवसांचा उत्सव आहे.
नवरात्राला रविवारपासून (ता. १५) सुरूवात होत आहे. पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात येणार आहे. घटस्थापनेच्या परंपरेविषयी कृषी विषयक अभ्यासक उदय देवळाणकर म्हणाले, की घटस्थापना जलपूजक संस्कृतीची जीवनपद्धती आहे. आजच्यासारखे पू्र्वी शेतीला लागणारे बियाणे विकत घेतले जात नव्हते तर ते घरचेच बियाणे वापरले जायचे. रब्बीसाठी लागणारे रब्बी ज्वारी, गहू, मसूर, जवस, करडई, हरभरा, रब्बी भाज्या यांची उगवण क्षमता या माध्यमातून तपासली जाते. मातीच्या घटातून पाणी झिरपून मातीत टाकलेल्या बियाणांचे अंकुरण होते, बियाणाची उगवण क्षमता कळते. यामुळे घरोघरी घटस्थापना केली जाते
श्री. देवळाणकर म्हणाले, की नऊ दिवसाच्या जागरणानंतर
सीमोल्लंघन केले जाते. यामागचा संकेत असा आहे की, खरीप हंगामाचे उत्पन्न हाती आलेले असते, हे उत्पादन घेऊन शेतीशिवायच्या कामासाठी गावाबाहेर पडणे, आपल्या गावच्या सीमा सोडून देशाटन करणे. मात्र, या सीमा ओलांडून जाण्यापूर्वी पुढच्या रब्बीच्या बियाणाची सोय केली आहे का, रब्बीसाठी पाण्याची सोय केली आहे का? याचा विचार करणे म्हणजे सीमोल्लंघन असा त्याचा अर्थ आहे.
पाणी संरक्षित करा
अक्षयतृतीयेपर्यंत पाणी संरक्षित करून ठेवण्याच्या अनुषंगाने श्री. देवळाणकर म्हणाले, की नवरात्रानंतर सहा महिन्यांनी उन्हाळ्यात येणाऱ्या अक्षयतृतीयेला (आखाजी) घट बसवले जातात आणि त्या घटातील पितरांना पाजले जाते. हे पाणी पिल्यानंतर पितर तृप्त होतात. याचा अर्थ असा, आपल्या पूर्वजांना समाधानी ठेवायचे असेल तर पाणी जपून वापरा पाण्याचा क्षय होणार नाही ते अक्षय राहील म्हणून अक्षयतृतीयेपर्यंत पाणी संरक्षित करा, पाण्याचा अक्षय संचय करा तरच आपली अक्षय सुरक्षा राहील, असा संदेश दिला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.