
नवीन शैक्षणिक वर्षावर कोरोनाचे सावट
औरंगाबाद : मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा कधी ऑनलाइन; तर कधी ऑफलाईन सुरु होत्या. यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याचे दिसत असल्यामुळे शाळांनी नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरु केली आहे. मात्र, राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाल्याने शिक्षक, पालक अन् विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेली दोन वर्षात कोरोनामुळे शिक्षणक्षेत्राची मोठी हानी झालेली आहे. प्राथमिक वर्गाच्या शाळा मागील दोन वर्षापासून ऑनलाईनच सुरु आहे. त्यामुळे दुसरी, तिसरीच्या मुलांनी अद्याप शाळेचे तोंड पाहिलेले नाही. या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे कमी आणि तोटेच जास्त दिसून आल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन सुरळीत पार पडल्या. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरळीत सुरु होईल, अशी पालकांना अपेक्षा होती.
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पुढील आठवड्यात सोमवारी शाळा सुरु होणार आहेत. त्यासाठी मोठ्या पालकांनी पाठ्यपुस्तके, वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्य खरेदी केली आहे. परंतू, राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या पाहून १३ जूनला शाळा वेळेवर सुरु होणार की राज्यात कोरोनाचे निर्बंध लावून शाळा पुन्हा बंद होणार असा प्रश्न उद्भवत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मास्क लावण्याचे, सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील शाळांबाबत एसओपी तयार करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. मात्र, सरकार कधी निर्बंध लावेल याची शाश्वती नसल्यामुळे शाळा सुरू होणार की, विद्यार्थ्यांना अजून प्रतिक्षा करावी लागणार यात अस्पष्टता आहे.
शाळांकडून पूर्व तयारी सुरू
शहरातील खासगी विनाअनुदानित, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांनी शिक्षक, मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात शाळांमध्ये प्रवेश करताना विद्यार्थी, शिक्षकांना मास्क, सॅनिटायझिंग, थर्मल स्कॅनिंग आवश्यक असणार आहे. आजारी शिक्षक, विद्यार्थ्यांनी शाळेत न येता घरीच थांबावे. स्वच्छतागृहांमध्ये हॅण्डवॉश, साबण, नियमित पाणी पुरवठा, स्वच्छता ठेवावी. विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी ताट व ग्लास स्वच्छ ठेवणे. सोशल डिस्टसिंगचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Web Title: New Academic Year Corona Students Concern
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..