Farmer News : शेतकरी ऊर्जादाताही व्हावा : नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari statement Farmers also energy providers ncp shard pawar aurangabad

Farmer News : शेतकरी ऊर्जादाताही व्हावा : नितीन गडकरी

औरंगाबाद : ‘‘मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या भूमीतून संतांनी समता, माणुसकीचा संदेश दिला. या भागाला विकासाची तहान आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. मराठवाडा हा शेतीबहुल भाग असून येथील शेतीचे भविष्य कसे उज्ज्वल होईल यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. शेतकरी अन्नदाता आणि सोबतच ऊर्जादाताही झाला पाहिजे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. प्रारंभी विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डी.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. मानव विद्याशाखेतील मानद ‘डी.लिट’ दोन्ही नेत्यांना प्रदान करण्यात आली.

अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पदवीचे वाचन केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, उपकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर आदी व्यासपीठावर उपस्थिती होते. गडकरी म्हणाले की, मराठवाड्यात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. तसेच जालना येथे होत असलेल्या ‘ड्रायपोर्ट’मुळे या भागाचा आणखी विकास होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाकडून ही पदवी आज मला प्रदान करण्यात आली, हा मी माझा बहुमान समजतो. त्याबद्दल मी विद्यापीठाचे आभार मानतो, असेही गडकरींनी नमूद केले.

शरद पवार भावुक

ज्या विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यासाठी सत्तेवर पाणी सोडावे लागले, त्याच विद्यापीठाने तब्बल ३२ वर्षांनंतर डी. लिट देऊन शरद पवार यांना गौरविले. डी. लिट देण्यापूर्वी पवार यांच्या कार्याचा आढावा घेणारी माहितीपट दाखवण्यात आली. यावेळी पवार भावुक होऊन काही क्षण स्तब्ध झाले होते.त्यांनी आंदोलनातील आठवणींसह विद्यापीठाच्या निर्मिती प्रक्रियेपासूनच्या घटनांना उजाळा दिला.विद्यापीठाने ‘डी.लिट’ने सन्मानित केल्याबद्दल कुलगुरू व सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली.