ANUK26A01505 ः
अंकुशनगर ः ‘ओबीसी आरक्षण बचाव’साठी अंतरवाली सराटीतील सोनियानगरमध्ये रविवारपासून उपोषणास बसलेले ॲड. मंगेश ससाणे व सहकारी.
.....
अंतरवालीत ‘ओबीसीं’साठी आंदोलन
---
ॲड. मंगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू
अंकुशनगर (जि. जालना), ता. ६ (बातमीदार) : मराठा आरक्षणासंदर्भात प्रलंबित मागण्यांसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनोज जरांगे यांचे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आता ओबीसी समाजाकडूनही अंतरवालीतील सोनियानगरमध्ये प्रतिआंदोलनाला सुरवात झाली आहे. ॲड. मंगेश ससाणे, प्रा. विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल, बाबासाहेब बटुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारपासून (ता. सहा) उपोषण सुरू केले आहे.
ॲड. ससाणे म्हणाले, ‘‘जरांगे यांच्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकला जात आहे. मराठा समाजाला आतापर्यंत २२ लाख कुणबी दाखले देण्यात आले आहेत. मंत्री व मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड हे त्यांच्यासाठी पायघड्या टाकत आहेत. आम्ही आमचे हक्क आणि अधिकार टिकवण्यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत. आता ओबीसींची मंत्रिमंडळ समिती येथे येते का, हे आम्ही पाहणार आहोत.’’ एका आडमुठ्या माणसामुळे महाराष्ट्र वेठीस धरला जात आहे, असा आरोप ससाणे यांनी केला.
----
काही मंत्र्यांकडून षड्यंत्र
--
मागेल त्याला कुणबी दाखला देणार, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटल्याचा दाखला देत ससाणे यांनी ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्यासाठी काही मंत्री षड्यंत्र रचत असल्याचा आरोप केला. मात्र, ओबीसी समाज आपल्या मागण्या आणि भूमिका संविधानिक मार्गाने मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका समाजाला ‘स्पेशल ट्रीटमेंट’ देत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान,
ओबीसी समाजातील काही तरुणांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून आत्महत्या केल्याचा दावा करत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच कुटुंबातील पात्र व्यक्तींना नोकरी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.