
सरणावरून परतलेल्या वृद्धेने घेतला अखेरचा श्वास
कन्नड - मृत्यू झाल्यामुळे एक वृद्धा स्मशानभूमीत अग्नीडाव देताना सरणावरुन उठून बसल्याची घटना कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे २ ऑगस्ट २०२१ रोजी घडली होती. अखेर य वृद्धेने तब्बल १० महिने जगल्यानंतर मंगळवारी (ता. ३१) अखेरचा श्वास घेतला. सदर वृध्द सरणावरुन उठल्यानंतर डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले होते.
जिजाबाई गोरे (वय ७५) असे या वृद्धेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अंधानेर येथील जीजाबाई यांना २ ऑगस्ट रोजी पाच वाजेच्या सुमारास गावातील एका खासगी डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. यामुळे सर्व जवळच्या नातेवाइकांना निधन वार्ता देण्यात आली. गावापासून स्मशानभूमीचे अंतर अर्धा किलोमीटर असल्याने कन्नड शहरातून स्वर्गरथ मागविण्यात आला होता. अंत्यसंस्कार करण्या अगोदरच्या सर्व क्रिया करण्यात आल्या. जवळपास रात्री नऊ वाजता स्मशानभूमीत अंत्ययात्रा पोचली.
मयत वृध्देस सरणावर ठेवण्यात आले. चारी बाजूने रॉकेलचाही शिडकावा करण्यात आला. शेवटी पाणी पाजण्याची क्रिया सुरु असताना सदर वृद्धेच्या डोळ्याच्या पापणी वर पाणी पडले व त्यांनी डोळ्यांची उघडझाप केली. हा प्रकार तेथे अंधार असल्याने उजेडासाठी हातात बॅटरी धरलेल्या इसमाच्या नजरेस आल्याने त्याने तत्काळ पुढील विधी थांबविला. लगेच अंगावर रचलेली लाकडे काढण्यात आली. यामुळे महिलेची हालचाल वाढली अन् चक्क वृद्धा उठून बसली. यामुळे सुरु असलेली नातेवाइकांची रडारड थांबून एकच खळबळ उडाली.
लगेच महिलेस सरणावरुन खाली घेण्यात आले. तत्काळ शहरातील डॉ.मनोज राठोड यांच्या दवाखान्यात उपचाराकरिता आणण्यात आले. यावेळी त्या जिवंत असून ह्रदय सुरु आहे. मात्र ब्रेन डेड असून त्या कोमात गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली मुले व सुना नातवंडे यांनी योग्य काळजी घेतली. यामुळे त्या तब्बल दहा महिने आपले जीवन जगल्या.
अखेर ३१ मे २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र मागील दहा वर्षाचा अनुभव बघता त्यांना तपासणी करिता शहरातील डॉ. सीताराम जाधव, डॉ. सदाशिव पाटील यांना बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी केली. मात्र, पुन्हा चूक होऊ नये म्हणून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांनी सर्व तपासणी करून तीन तासानंतर सदर वृध्देस मृत घोषित केले. त्यानंतर रात्री गावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितीत नातेवाइकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सदर वृद्धा माजी नगरसेवक विलास गोरे यांच्या मातोश्री होत.
Web Title: Old Women Returning From Shelter Took His Last Breath
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..