
शंभर शहर बस होणार इलेक्ट्रिक
औरंगाबाद - शहरांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केली जात आहे. आता स्मार्ट सिटीतर्फे चालविल्या जाणाऱ्या शंभर शहर बस इलेक्ट्रिक बसमध्ये रुपांतरीत केल्या जाणार आहेत. त्यासाठी २८.४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ठराव मंजूर केला आहे.
शहरांचे प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार वित्त आयोगातून मिळणारा जास्तीत- जास्त निधी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वापरण्यात यावा, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविला जात आहे. त्यासोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी १४ ऑक्टोबर २०२१ ला पत्र काढले असून, इलेक्ट्रीक धोरण-२०२१ व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम धोरणानुसार सुधारित शहर कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या.
त्यानुसार महापालिकेने शहरात ईव्ही कन्व्हरजन संदर्भात शहर कृती आराखडा तीन फेब्रुवारी २०२२ ला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर केला. १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महापालिकेला २०२०-२१ ते २०२५-२६ पर्यंत ११९ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. महापालिकेने ८० टक्के म्हणजेच ९३.३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षात १५.६९ कोटी व प्रोत्साहनपर रक्कम ७.२ कोटी आणि प्राप्त निधीतील उर्वरित रक्कम ५.५२ कोटी या प्रमाणे २८.४१ कोटी रुपये स्मार्ट बससाठी वापरण्यास प्रशासकांनी मान्यता दिली आहे.
Web Title: One Hundred City Buses Will Be Electric Aurangabad Muncipal Corporation Smart City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..