ना ऑनलाइनची सुविधा, ना प्रशासनाला गांभीर्य
तहसीलची रेकॉर्ड रुम बनलीय मनस्तापाचा अड्डा; शेतकऱ्यांच्या हाती निराशाच
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १३ : बीड तहसील कार्यालयातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मानला जाणारा अभिलेख कक्ष (रेकॉर्ड रुम) सध्या प्रशासकीय अनास्थेमुळे आणि भोंगळ कारभारामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. फेरफार, खासरा पाहणी आणि जुने महसुली रेकॉर्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी दररोज शेतकरी आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दिरंगाईचा कारभार आणि ढिसाळ नियोजनामुळे सलग आठवडाभर हेलपाटे मारूनही नागरिकांच्या हाती कागदपत्रे पडत नाहीत. या मनस्तापामुळे प्रशासनाविरोधात शेतकरी वर्गातून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या बँक कर्जासाठी, जमिनीच्या न्यायालयीन वादासाठी, तसेच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक प्रवेशांसाठी जुन्या पुराव्यांची तातडीने गरज भासत आहे. मात्र, रेकॉर्ड रुममधील कागदपत्रांच्या ढिगाऱ्यातून जुने पुरावे शोधण्याच्या जुनाट आणि किचकट पद्धतीमुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हातातील महत्त्वाची शेतीकामे सोडून शेतकऱ्यांना दिवस-दिवस तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. सातबारा आणि आठ-अ उताऱ्यांप्रमाणेच रेकॉर्ड रुममधील सर्व जुनी कागदपत्रे, फेरफार व खासरा नोंदींचे तत्काळ संगणकीकरण करून ती ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यास हा त्रास कायमचा संपुष्टात येईल, अशी ठाम मागणी बीड तालुक्यातील त्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
------
शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल
जुनी कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची बँक कर्जे आणि न्यायालयीन कामे रखडली आहेत. तसेच, जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुरावे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाच्या या लालफितशाहीमुळे आणि संथ कारभारामुळे सर्वसामान्यांचा मौल्यवान वेळ आणि पैसा दोन्ही नाहक वाया जात आहे.
------
कोट
रेकॉर्ड रुमच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी आणि विद्यार्थी कमालीचे त्रस्त आहेत. कामे सोडून कागदपत्रांसाठी आठवडाभर चकरा माराव्या लागणे हा मोठा अन्याय आहे. प्रशासनाने तत्काळ सर्व जुनी कागदपत्रे ऑनलाईन करावीत. एका महिन्यात व्यवस्था सुरळीत न झाल्यास तहसीलला कुलूप ठोकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
- बाळासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते
------
कोट
अभिलेख कक्षात कागदपत्रांसाठी मोठी गर्दी होत असून नागरिकांना तत्काळ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जुने रेकॉर्ड शोधण्यास तांत्रिक वेळ लागतो. मात्र, सर्व फेरफार व जुन्या नोंदींचे संगणकीकरण करण्याचे काम गतीने सुरू आहे. कर्मचाऱ्यांना सूचना देऊन ही प्रक्रिया अधिक गतीने पूर्ण केली जाईल व लवकरच नागरिकांना ऑनलाइन सुविधेचा दिलासा मिळेल.
- चंद्रकांत शेळके, तहसीलदार, बीड