----
((((ग्राहक हक्क))))
ऑनलाइन खरेदी केली पण पैसे परत मिळाले नाहीत तर?
आज मोबाइलवर दोन मिनिटांत वस्तू मागवता येतात. कपडे, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरातील सामान इतकेच काय तर जेवण आणि औषधेही ऑनलाइन मिळतात. मात्र वस्तू आवडली नाही, चुकीची वस्तू आली किंवा ऑर्डर रद्द झाली तर पुढचा प्रश्न सुरू होतो तो म्हणजे पैसे परत कधी मिळणार?
अनेकदा ग्राहकांना Refund will be processed shortly, Your request has been forwarded अशी उत्तरे दिली जातात. काही वेळा ग्राहक सेवा केंद्राकडून एकामागून एक तक्रार क्रमांक दिले जातात पण प्रत्यक्षात पैसे परत मिळण्यासाठी ग्राहकाला अनेक दिवस पाठपुरावा करावा लागतो.
ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ हा केवळ दुकानातून वस्तू घेतलेल्या ग्राहकांसाठी नाही. ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही या कायद्याचे संरक्षण मिळते. वस्तूमध्ये दोष असेल, सेवा योग्य प्रकारे मिळाली नसेल किंवा ग्राहकाला चुकीची माहिती देऊन खरेदी करण्यास प्रवृत्त केले असेल, तर ग्राहकाला कायदेशीर उपाय उपलब्ध आहेत.
विशेषत ऑनलाइन व्यवहारात जाहिरात आणि प्रत्यक्ष वस्तू यामध्ये फरक असणे, लपविलेले शुल्क आकारणे, रिफंड देण्यास अनावश्यक विलंब करणे किंवा ग्राहकाची तक्रार योग्य पद्धतीने न हाताळणे या बाबी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
मात्र, प्रत्येक छोट्या वादासाठी थेट न्यायालयात जाणेही योग्य नाही. ग्राहकाने सर्वप्रथम ऑर्डरची माहिती, बिल, पेमेंटचा पुरावा, ई मेल, चॅट आणि कंपनीसोबत झालेला पत्रव्यवहार जपून ठेवावा. त्यानंतर संबंधित कंपनीकडे लेखी तक्रार करावी. प्रश्न सुटला नाही तर ग्राहक आयोगाचा मार्ग खुला आहे.
ग्राहक म्हणून आपला अधिकार माहिती असणे ही आज गरज आहे. पैसे दिले म्हणजे वस्तू मिळाली आणि विषय संपला एवढेच ग्राहकाचे नाते नाही. योग्य वस्तू, योग्य सेवा आणि योग्य व्यवहार मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे. आणि हा हक्क वापरण्यासाठी सर्वांत आधी ग्राहकाने स्वतः जागरूक होणे गरजेचे आहे.
- ॲड. अमोल वाघमारे
९०६७१२९२२२
----