जकातच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक
‘एसआयओ’च्या नावावर लाखो लाटले, एटीएसच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ३ ः जकात आणि देणगीच्या नावाखाली सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अस्लम चांदपाशा शेख (रा. खाजानगर, धाराशिव) आणि स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन (एसआयओ) धाराशिवचा सदस्य निहाल सिकंदर शेख (रा. सुलतानपुरा, येडशी रोड, धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्च २०२५ ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दोन्ही आरोपींनी संगनमत केले. एसआयओ धाराशिव या संस्थेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटचा वापर करून त्यांनी लोकांना जकात आणि देणगी देण्याचे आवाहन केले. लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर, जमा होणारा निधी संस्थेच्या अधिकृत बँक खात्यावर न घेता आरोपींनी स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांचे क्यूआर कोड आणि यूपीआय आयडी सोशल मीडियावर प्रसारित केले. या ऑनलाइन माध्यमांचा वापर करून त्यांनी लोकांकडून देणगीचा निधी स्वतःच्या खात्यावर वळवून मोठी फसवणूक केली.
एटीएसची कारवाई
याप्रकरणी एटीएसच्या छत्रपती संभाजीनगर युनिटचे (कॅम्प धाराशिव) अधिकारी फयाजोद्दीन गयासोद्दीन काझी (वय ४९) यांनी बुधवारी (ता. दोन) धाराशिव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का आणि निधी कुठे वापरला गेला, याचा सखोल तपास धाराशिव शहर पोलिस करत आहेत.