esakal | उमरग्यात २३ दिवसांत ६१ जणांचा मृत्यु, स्मशानभूमीत जागा पुरेना!

बोलून बातमी शोधा

null
उमरग्यात २३ दिवसांत ६१ जणांचा मृत्यु, स्मशानभूमीत जागा पुरेना!
sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहरात व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दुप्पटीने वाढत आहे. शुक्रवारी (ता.२३) दहा जणांचा मृत्यू झाला असून एप्रिल महिन्यात एकुण ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक स्मशानभूमीत मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रतिक्षा करण्याची वेळ नातेवाईकावर येत आहे. दरम्यान डोळ्यादेखत अनेकांचा मृत्यू होत आहे शिवाय ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याचे चित्र आहे. तरीही काही नागरिकांमध्ये गांभीर्य राहिलेले नाही. सजग राहुन स्वतः बरोबर कुटुंबाची काळजी घेणे हा एकमेव पर्याय उरला आहे.

कोरोना संसर्गानंतर उपचार घेऊन बहुतांश लोक कोरोनामुक्त होत आहेत. मात्र त्यांना सोसावे लागणारे दुखणे भलतेच आहे. शारीरिक तंदुरुस्तीपेक्षा रुग्णांना मानसिक धैर्य देणे गरजेचे झाले आहे. आजार अंगावर घेतले जात असल्याने उशीराच्या उपचाराने रुग्णांकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान एप्रिल महिन्यात तर संसर्गाने कहर केला आहे. शुक्रवारी तर तब्बल ८८ जण पॉझीटिव्ह आले आहेत.

हेही वाचा: जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला

स्मशानभूमीत जागा पुरेना!

उमरग्यातील सरकारी व खासगी कोविड सेंटरमध्ये दररोज सरासरी सहा रुग्ण दगावत आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दोन लोखंडी पिंजऱ्यात जागा पुरेना. मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. नातेवाईकांना रक्षा विधीची संधी मिळत आहे. घास शिवायला कावळेही येईनात. काही नातेवाईक गाईला आणत आहेत. असा भयावह चित्र असल्याने नागरिकांनी स्वतः बरोबरच कुटुंबाची काळजी घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.