esakal | धक्कादायक! हॉटेलची उधारी मागणे पडले महागात, तरूणाचा दगडाने ठेचून खून
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! हॉटेलची उधारी मागणे पडले महागात, तरूणाचा दगडाने ठेचून खून

धक्कादायक! हॉटेलची उधारी मागणे पडले महागात, तरूणाचा दगडाने ठेचून खून

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : शहरातील काळे प्लॉट येथील पालिकेच्या आठवडे बाजारातील शेड समोर एका पंचवीस वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बुधवारी (ता. २१)   पहाटेच्या वेळी उघडकीस आल्याने  एकच खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणी मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून तिघांना  ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली अशी की, शहरातील  आकाश दत्तात्रय अबाचणे (वय २५, रा.काळे प्लॉट) हा मुळज रोड परिसरात हॉटेलचा व्यवसाय करीत होता. त्याच्या हॉटेलमध्ये रोहित चुंगे व आकाश धोत्रे हे चहा पिऊन जात असत. पण पैसे देत नसत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आकाशचे हॉटेल बंद होते. त्यामुळे आकाश हा रोहित चुंगे व आकाश धोत्रे यांना उधारीचे पैसे मागत होता. तू आम्हाला पैसे कसे मागितले म्हणून या दोघांनी आकाशला शिवीगाळ केली होती.

१८ एप्रिलला  रात्री मृत आकाशच्या घरी येऊन आकाश, त्याची आई व भावास शिवीगाळ करीत मारहाण केली होती. या वेळी या दोन आरोपींसोबत व्यकंट धोत्रे सुद्धा होता. यावेळी घाबरून आकाशने याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती. मंगळवारी (ता. २०) रात्री दहाच्या सुमारास मृत आकाश हा घरी जेवण करून खोलीवर झोपण्यासाठी गेला होता. दरम्यान बुधवारी पहाटे आकाशचा मृतदेह मुळज रोडलगत असलेल्या आठवडे बाजाराच्या जागेतील पत्र्याच्या कॉम्पलेक्स समोर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आला. डोक्यात दगडाने जबर मारहाण करुन खुन केल्याचा प्रकार दिसून आला. 

आकाश अबाचणे याचा लहान भाऊ राजेंद्र दत्तात्रय अबाचणे यांच्या फिर्यादीनुसार हॉटेलच्या उधारी मागण्यावरून आरोपी रोहित चुंगे, आकाश धोत्रे, व्यकंट धोत्रे, प्रशांत पुरातले (सर्व रा.उमरगा) व विकास जाधव (रा. तुरोरी, ता. उमरगा) यांनी मिळून खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून व्यकंट धोत्रे, विकास जाधव व प्रशांत पुरातले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहित चुंगे व आकाश धोत्रे दोघे फरार आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे तपास करीत आहेत.

श्वान पथकाने आरोपीच्या घराकडे माग दाखवला : उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, उपनिरीक्षक अमोल मालुसरे, रमाकांत शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दुपारी अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकाने घटनास्थळी सापडलेल्या चपलेचा वासावरून माग काढला तो आरोपीच्या घरापर्यंत गेला.

loading image